पुणे । देशात प्रत्येक नवजात बालकाला शिक्षणाचा अधिकार मिळायला पाहिजे. त्यासाठी संबंधित कायद्यांची प्रामाणिक अंमलबजावणी झाली पाहिजे, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनी केले.बुकमार्क पब्लिकेशन्स आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या वतीने व्यवस्थापनाचे माजी प्राध्यापक डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘सप्तरंग, आपले व्यवस्थापन आपल्या हाती आणि अध्यात्म चिंतन’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रा.डॉ. विश्वनाथ कराड, प्रा.डॉ.प्र.चिं. शेजवलकर, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी, डॉ. रामचंद्र देखणे, पराग पिंगळे आदी उपस्थित होते.
आधुनिक शिक्षणासह माणुसकीसुद्धा जपावी
डॉ. निगवेकर म्हणाले, 21व्या शतकात शिक्षण पद्धतीची खर्या अर्थाने उकल करून चर्चा होत नाही. भारतातील राज्या-राज्यातील शिक्षणपद्धतीत मोठ्या प्रमाणात फरक आहे. तरीसुद्धा तेथील शिक्षक वर्ग विद्यार्थांना ज्ञान देण्याचे कार्य उत्तम पद्धतीने करीत आहेत. जग बदलत आहे आम्ही 2001 ते 10 या एका दशकाद्वारे 21 व्या शतकामध्ये प्रवेश केला आहे. केवळ स्वातंत्र्य मिळवून देणार्यांविषयी कृतज्ञतेला चिकटून बसणे हे योग्य नाही. त्यामुळे 21 व्या शतकातील पिढीने आधुनिक शिक्षणाचा ध्यास घेऊन माणुसकीसुद्धा जपली पाहिजे.
‘दासबोध’ व्यवस्थापनावरील ग्रंथ
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ‘दासबोध’ हा व्यवस्थापनावरील सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे. त्यात व्यवहार आणि जीवन कसे जगावे याचे सुद्धा सखोल ज्ञान रामदास स्वामींनी नमूद केले आहे. ज्याचा उपयोग आजच्या युगात सुद्धा होत आहे. त्यामुळेच 21 व्या शतकात विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय करण्याचे ज्ञान नव्या पिढीला द्यावे लागेल.
भारतीय व्यवस्थापन पद्धती शिकवावी
डॉ. कुलकर्णी म्हणाले, तीन पुस्तकांचे प्रकाशन एकाच वेळी होणे हा माझ्या जीवनातील ऐतिहासिक क्षण आहे. गेल्या 50 वर्षांच्या कालखंडामध्ये आलेल्या अनुभवातून या पुस्तकांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ.शेजवलकर म्हणाले, आपण अमेकिन, जपानी यांच्या व्यवस्थापन पद्धतींचे अध्यापन करतो. पण भारतीय व्यवस्थापन पद्धती देशातील प्रत्येक विद्यापीठामध्ये शिकविली गेली पाहिजे. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांनी जीवनाचे खरे व्यवस्थापन आपल्या ग्रंथांतून मांडले आहे. डॉ. देखणे म्हणाले, पुस्तकातून अध्यात्म हा अतिशय बोजड समजला जाणारा विषय त्यात अगदी सोप्या पद्धतीने सांगितला आहे.