प्रत्येक सदस्यांनी सुचवावी पाच कामे; किमान दोन कामे मिळणार!

0

जळगाव। जिल्हा परिषदेची नविन कार्यकारिणी जाहीर होऊन जवळपास दोन महिन्याचा कार्यकाळ उलटला आहे. सर्व समित्या स्थापन झाले असून कामांना आता वेग आले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्यांकडून प्रत्येकी पाच कामे सुचविण्याची मागणी केली आहे. त्यापैकी किमान दोन कामांना मंजुरी मिळणार आहे. अध्यक्षांतर्फे सर्व जिल्हा परिषद सदस्यांना वैयक्तिकरित्या काम सुचविण्यासाठी संपर्क साधला जातो आहे. जिल्हा परिषदेचे एकुण 67 सदस्य आणि सर्व सदस्यांना कामे सुरविण्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गटात किमान काम झाले पाहिजे या हेतुने कामे सुचविण्याची मागणी अध्यक्ष करीत आहे.

पाच कामे सुचवा
मुलभूत सुविधा, नागरी सुविधा, अल्पसंख्याक सुविधा योजनेंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांना पाच कामे सुचविण्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्येक सदस्यांनी किमान दोन कामे सुचवावे असे सांगण्यात आले आहे. या माध्यमातुन प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांना त्यांच्या गटात काम करण्याची संधी मिळणार आहे.

पुरेशा निधीची मागणी
प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सदस्यांकडून कामे सुचविण्याची मागणी केली जाते आहे. सुचविलेल्या कामांसाठी पुरेशा निधी पुरविला जावा अशी मागणी काही जिल्हा परिषद सदस्यांनी केली आहे. कामाला सुरुवात झाल्यानंतर निधी अभावी कामे थांबतात हा आजपर्यतचा अनुभव असल्याची खंत देखील सदस्यांनी व्यक्त केली. पुरेसा निधी मिळावा या अटीवर काही सदस्यांनी कामे सुचविण्याचे सांगितले.

दोन कोटीची कामे होणार
मुलभूत सुविधा, नागरी सुविधा, अल्पसंख्याक सुविधा योजनेंतर्गत जिल्ह्यात 2 कोटीचे कामे केली जाणार आहे. त्यापार्श्‍वभूमीवरच प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांकडून कामे सुचविण्यासाठी वैयक्तिकरित्या कळविण्यात आले आहे. प्रत्येक सदस्यांना कमी अधिक प्रमाणात निधी मिळणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रत्येक सदस्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याची यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वलाताई पाटील यांनी कळविले आहे.