बोदवड । येथे बुधवार 24 रोजी सकाळी 9 वाजता एक आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला, तो म्हणजे येथून रोज सकाळी 9.25 मिनीटांनी बोदवड पुणे ही बस नियमित जाते. या बसला सुरु करण्याकरीता प्रवासी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी फार प्रयत्न केले होते.
बस सुरु होऊन आज 7 वर्षे पुर्ण झाल्याने बोदवड पुणे या बसचा सातवा वाढदिवस साजरा करण्यात आला.
असुविधांबाबत वेधले लक्ष
बोदवड येथील नगराध्यक्षा मुमताजबी बागवान तसेच जळगाव येथील अभियंता प्रशांत वासकर यांच्या हस्ते बोदवड – पुणे बस समोर केक कापुन सातवा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पाचोरा आगार प्रमुख सी.जी. पाटील, जामनेर आगार प्रमुख धनराळे, मुक्ताईनगर आगारप्रमुख वाणी तसेच गावातील प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बिहारी आदुजा, डॉ.मुथा सुनिल जैन तेच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ अग्रवाल, श्रीराम बडगुजर, विकास कोटेचा, नगरसेवक देवेंद्र खेवलकर आदींची उपस्थिती होती. यावेळी बसचे चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला. नागरिकांनी होणार्या असुविधांबाबत यावेळी लक्ष वेधून घेतले. पाण्याचा प्रश्न, महिला सुरक्षेचा प्रश्न, शालेय विद्यार्थ्यांना नियमीत बसचा प्रश्न, बेशिस्त वाहन पार्किंग, बोदवड वरुन जळगाव जाण्यासाठी एकही बस नाही इत्यादी समस्या मांडल्या. वासकर यांनी समस्यांचे सोडवू असे आश्वासन यावेळी नागरिकांना दिले. तसेच शासनाच्या नियमानूसार तालुका प्लस डेपो असतो. मात्र बोदवड हा तालुका होवून 20 वर्ष होऊनही याठिकाणी डेपो नाही. डेपो होणे गरजेचे आहे त्यामुळे प्रवाशी व विद्यार्थ्यांची अडचण दूर होणार आहे.