प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेची दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण 

0
केंद्रिय सचिवांकडून कौतुक झाल्याची मुख्य सचिवांची माहिती
मुंबई : राज्यात नरेगा अंतर्गत कृषी, जलसंधारण विषयक कामे मोठ्या प्रमाणावर झाली असून यंदा 76 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर रोजगार हमी मजूरांना वेळेवर मजुरी देण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण 91 टक्के असून सर्वाधिक असून प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या टप्पा – 2 मधील राज्यातील सर्व कामे पूर्ण झाल्याबद्दल केंद्रिय ग्रामविकास सचिवांनी महाराष्ट्राचे कौतुक केले, अशी माहिती मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी दिली.
केंद्रिय ग्रामविकास सचिव अमरजित सिन्हा यांनी राज्यातील नरेगा, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), संसद आदर्श ग्राम योजना, रुरबन मिशन, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान याबाबत आढावा घेतला. मुख्य सचिवांच्या दालनात ही बैठक झाली. महाराष्ट्राने ग्रामीण भागातील रस्ते आणि पुल उभारणीच्या कामांमध्ये गती घेतली असून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा-2 मधील गडचिरोली वगळता राज्यातील उर्वरित भागातील कामे पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्राचा गौरव केला.
नरेगामध्ये महाराष्ट्राची प्रगती लक्षणिय असल्याचे सांगत रोजगार हमीच्या मजूरांना वेळेवर निधी वाटपामध्ये राज्य अग्रेसर असल्याचे श्री. सिन्हा यांनी बैठकीत सांगितले. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कृषी, जलसंधारण विषयक कामे मोठ्या प्रमाणावर झाल्याबद्दल त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. रोजगार हमी योजनेत साहित्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या कुशल निधी केंद्राकडून वितरित न झाल्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी  सिन्हा यांनी तातडीने 138 कोटी रुपये वितरित केले.आदिवासी दुर्गम भागातील रस्ते आणि पुलांच्या कामांना गती द्यावी, असे यावेळी त्यांनी सांगितले.