मुंबई । दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी हत्याकांडासारखे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा धक्कादायक ई-मेल पोलीस यंत्रणेला मिळाला आहे. याबाबतचे वृत्त कळताच असे षडयंत्र रचणार्या हिंसक देशविघातक प्रवृत्तीचा तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार देशाचा कारभार करत असून, सबका साथ सबका विकास हे सूत्र घेऊन ते संविधानातील भारत साकारत आहेत.
त्यांच्यावर कोणत्याही एका धर्माला ताकद देत असल्याचा आरोप चुकीचा असून, त्यांच्याविरुद्ध आत्मघातकी हल्ला करण्याचे षडयंत्र रचणार्या देशविघातक शक्तींचा आपण निषेध करत आहोत. अशा खुनी हल्ल्यांच्या धमक्यांना प्रधानमंत्री बळी पडणार नाहीत. आत्मघातकी हल्ल्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना संपवण्याचे कारस्थान रचणार्या शक्तींना जनता माफ करणार नाही, असे ना. रामदास आठवले यांनी म्हटले आहे. पुणे सत्र न्यायालयात सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना राजीव गांधी हत्याकांडासारखे आत्मघातकी हल्ल्यात संपवण्याचा कट असल्याचा ई-मेल पोलिसांना मिळाला आहे, अशी धक्कादायक माहिती दिली.