प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; 170 नागरीकांनी भरले फार्म

0

शिक्षण सभापती अ‍ॅड.बोधराज चौधरी यांचा उपक्रम ; अधिकाधिक नागरीकांना लाभ घेण्याचे आवाहन

भुसावळ- शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरीकांसाठी प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थी सर्वेक्षण शिबिराचे आयोजन टिंबर मार्केटमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ करण्यात आले. पहिल्याच दिवशी 170 नागरीकांनी नोंदणी करून कागदपत्रे सादर केली. या योजनेच्या निकषात बसणार्‍या नागरीकांनी जास्तीस जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅड.बोधराज चौधरी व नगरसेविका सोनी संतोष बारसे यांनी केले आहे.

अल्प उत्पन्न गटाच्या लाभार्थींसाठी योजना
या योजनेंतर्गत ज्यांच्याकडे घर नाही तसेच आर्थिक दुर्बल घटकांना (झोपडपट्टीवासी) व अल्प उत्पन्न असणार्‍या लाभार्थींना लाभ घेता येणार आहे. तीन लाखांपर्यंत उत्पन्न असणार्‍या लाभार्थीस 322 चौरस फूट घर बांधता येणार आहे. शहरातील बेघर तसेच योजनेच्या निकषात बसणारे भाडेकरूदेखील योजनेचा लाभ घेवू शकणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी सर्व कुटुंबियांचे आधारकार्ड, नगरपालिका कराच्या अद्ययावत पावत्या, घराचे लाईटबिल, बँकपासबुक स्व.प्रमाणित उत्पन्नाचा दाखला, पुरूष व स्त्रीचा पासपोर्ट फोटो, स्व.मालकिची गावठाण जागा किंवा नवीन ले आऊटमध्ये पलॉट असल्यास त्या जागेची कागदपत्रे, 2011 च्या जनगणनेनुसार यादीत लाभधारकाचे नाव असल्यास त्यापूर्वीपासून रहिवासी असल्याचा दाखला आदी कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.

प्रभागातील नागरीकांसाठी शिबिराचे आयोजन
खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर आदींच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक नऊमधील नागरीकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त लाभ मिळाला, प्रभागातील नागरीकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे या प्रभागाचे नगरसेवक अ‍ॅड.बोधराज डी.चौधरी व नगरसेविका सोनी संतोष बारसे म्हणाल्या.