दोन माजी महापौर, एक माजी उपमहापौर रिंगणात
जळगाव- महानगरपालिका निवडणुकीत प्रचार शिगेला पोहचला आहे. भरपावसातही उमेदवार प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यंदा प्रभाग रचना बदलल्याने व अचानक निवडणूक जाहीर झाल्याने प्रचारासाठी कालावधी कमी व प्रभाग मोठा यामुळे उमेदवारांची तारांबळ उडताना दिसत आहे. या निवडणुकीत अनेक लढती लक्षवेधी ठरणार आहेत, त्यापैकीच प्रभाग पाच मध्ये होणार्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या प्रभागात दोन माजी महापौर, माजी उपमहापौर हे निवडणूक रिंगणात असून त्यांच्यासमोर भाजप, राष्ट्रवादी व अपक्षांचे तगडे आव्हान आहे.
सर्वाधिक मतदार असलेला प्रभाग
जळगाव शहरातील सर्वाधिक मतदार संख्या असलेला व सर्व महत्त्वाची व्यापारी संकुले असलेला प्रभाग पाच हा शहराचा मध्यवर्ती भाग आहे. नवी पेढ, भवानी पेठ, शनिपेठेचा काही भाग, दिक्षित वाडी, ओकांर नगर, पत्रकार कॉलनी, राधाकिसन वाडी, जयकिसनवाडी, खान्देश मील परिसर तसेच दाट वस्तीचे शाहू नगर या भागांचा या प्रभागात समावेश होतो. प्रभाग पाच हा प्रामुख्याने मनपा सभागृहातील ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. मात्र, यंदा प्रकृती अस्वास्थामुळे ते निवडणूक रिंगणातून बाहेर आहेत. मात्र, या प्रभागातही चौरंगी लढत आहेत. दोन माजी महापौरांसह एक उपमहापौर निवडणूक रिंगणात असल्याने त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यांच्यासमोर भाजपकडून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे खंदे समर्थक व भाजपाचे गटनेते सुनील माळी, अनिल पगारीया यांचे मोठे आव्हान आहे. एकंदरीत भाजप सेना लढतीमुळे निर्माण झालेली उत्सुकता या प्रभागात अधिकच पाहायला मिळत आहे. सर्वाधिक मतदार असलेला शिवाय मुख्य व्यापारी संकुलांचा हा परिसर असल्याने या प्रभागावर कोणाचे वर्चस्व राहणार याकडे सर्वांचेचे लक्ष लागून आहे.