प्रभाग समिती स्वीकृत निवडणुकीचा आज फैसला

0

121 जण निवडणुकीच्या रिंगणात : इच्छुकांची नेत्यांकडे मोर्चेबांधणी

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीसाठी 121 उमेदवार रिंगणात असून यापैकी 24 जणांची वर्णी लागणार आहे. आठही प्रभागावर सत्ताधारी भाजपचे वर्चस्व असल्याने त्यांचेच सर्व उमेदवार निवडून येणार आहेत. कोणाला संधी द्यायची यावरुन धुसफूस सुरु आहे. इच्छुक नेत्यांचे उंबरठे झिजवित आहेत. दरम्यान, अधिक कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी स्वीकृत सदस्यपदाचा दोन वर्षाचा कालावधी निश्‍चित केला आहे. तसेच प्रभाग समितीवर जाण्यासाठी माजी नगरसेवकांनी देखील अर्ज केले आहेत. प्रभाग समितीच्या गुरूवारी (दि. 26) होणार्‍या विशेष सभेत स्वीकृत सदस्यपदासाठी निवडणुक घेतली जाणार आहे.

समित्या म्हणजे मिनी महापालिका
मिनी महापालिका असा दर्जा मिळालेल्या प्रभाग समित्यांना महापालिका राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान आहे. या प्रभाग समित्यांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होत असल्याने तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्‍नांना याठिकाणी न्याय देणे शक्य असल्याने राजकीय दृष्ट्याही त्यांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे प्रभाग समित्यांवर जाण्यासाठी भाऊगर्दी झाली आहे. महापालिकेची आठ प्रभाग कार्यालये आहेत. प्रत्येक प्रभाग समित्यांसाठी स्वयंसेवी संस्थांचे तीन प्रतिनिधी स्वीकृत सदस्य म्हणून निवडले जातात. मात्र, राजकीय कार्यकर्त्यांचीच निवड केली जाते. प्रभाग कार्यालयांकडे येणा-या अर्जांमधून त्यांची निवड केली जाते. त्यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून निवड प्रक्रिया जाहीर करण्यात येते. महापालिका आयुक्तांकडून त्यासाठी एका अधिकायालाही प्राधिकृत करण्यात येते.

160 पैकी 121 अर्ज वैध
महापालिकेने स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करुन अर्ज मागविली होते. अ प्रभागात 19, ब 27, क 15, ड 10, ई 7, फ 16, ग 15 आणि ह 12 असे एकूण 121 अर्ज प्राप्त झाले होते. वैध-अवैध अर्जाची यादी अवैधतेच्या कारणांसह 13 एप्रिल रोजी प्रभाग कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध झाली. 160 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 121 वैध ठरले आहेत. वैध ठरलेले अर्ज प्रभाग समितीच्या गुरूवारी होणार्‍या विशेष सभेत ठेऊन निवडणूक घेतली जाणार आहे.

नेत्यांकडे फिल्डिंग
प्रभाग समितीवर जाण्यासाठी 121 जणांनी अर्ज केले आहेत. यातील बहुतांश भाजपचे समर्थक आहेत. त्यामुळे प्रभागावर कोणाला संधी द्यायची, यावरुन सत्ताधारी भाजपमध्ये धुसफूस सुरु आहे. महापालिका निवडणुकीत शब्द दिलेल्यांना प्रभागावर भाजपला घ्यावे लागणार आहे. इच्छुकांनी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, सहयोगी आमदार महेश लांडगे, सभागृह नेते एकनाथ पवार, सदाशिव खाडे यांच्याकडे ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.