प्रभाग १३, ३, ४ मध्ये कोट्यावधीचा निधी दिला तेव्हा भाजपचा विरोध का नाही ? – उपमहापौर कुलभूषण पाटील

 

जळगाव : प्रभाग क्रमांक १० मध्ये ५ कोटी रुपयांची विकास कामांना मंजुरी देतांना भाजपतर्फे विरोध करण्यात आला व मंजुर ५ कोटींच्या निधीमधून दलित वस्तीच्या प्रभागामध्ये समान निधी वाटप झाला पाहिजे अशी भूमिका घेतली. परंतु यापुर्वी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गंत मिळालेल्या निधीमधून प्रभाग क्रमांक १३, ४ व ३ मध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात आला. त्यावेळी भाजप नगरसेवकांनी समान निधी वाटपाचा मुद्दा का मांडला नाही, असा प्रश्न उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी उपस्थित केला आहे.

भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांना एकाच प्रभागात ५ कोटींचा निधी न वापरता सर्व दलित वस्तीच्या प्रभागामध्ये समान निधी वाटप करण्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी प्रतिउत्तर दिले.

उपमहापौर म्हणाले की, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गंत दि.२१ नोव्हेंबर २०२० ला मंजुर झालेल्या १ कोटी १३ लाख ८९ हजार रुपयांच्या निधीमधून प्रभाग क्र. ३ मधील कामे घेण्यात आली. दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी मंजुर झालेल्या २ कोटी ९ लाख ९ हजार रुपयांच्या निधीमधून प्रभाग क्रमांक ३ मधील कामे घेण्यात आली. तसेच दि.१६ जानेवारी २०२० रोजी मंजुर झालेल्या १ कोटी ९८ लाख रुपयांचा निधीमधून प्रभाग क्र ३, ४ व १३ मधील विकास कामे घेण्यात आली होती. या प्रभागामध्ये कामे देतांना ते प्रभाग भाजप नगरसेवकांचे असतांनाही आम्ही विरोध केला नसून शहराचा विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता. परंतु प्रभाग क्रमांक १० मधील विकास कामांचा विषय आला त्यावेळी भाजप नगरसेवकांनी केलेल्या विरोधामुळे जनतेचे नुकसान होत असून विकास कामांना खोडा आहे, असे मत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी व्यक्त केले आहे.

त्यांना विकासाबद्दल घेणे देणे नाही

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील ५ कोटींच्या कामांना विरोध करु नये, मी तुमच्या प्रभागांमधील विकास कामांसाठी वेगळा ३ कोटी रुपयांचा निधी देतो, असे भाजन नगरसेवकांना आश्वासन दिल्यानंतर देखील भाजपचे नगरसेवक ५ कोटींच्या कामांना विरोध करत असतील तर, त्यांना फक्त सत्ताधाऱ्यांना विरोध करावयाचा आहे, त्यांना शहराच्या विकासाशी काही देणे घेणे नसल्याचे स्पष्ट होते, असेही उपमहापौर यांनी सांगितले.