प्रलंबित प्रश्‍नांना तातडीने वेग देण्याचे आयुक्तांचे आदेश

0

पिंपरी मतदारसंघातील प्रश्‍नांसाठी आ. चाबुकस्वार आणि आयुक्तांची झाली बैठक

मल्टीस्टोअरेज पार्कींग उभारण्याच्या कामाला गती मिळणार

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिके अंतर्गत अनेक विकासकामे सुरू आहेत. अनेकठिकाणी रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते आहे. पिंपरीतील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, विकास आराखडयाची अंमलबजावणी करण्यासाठी, बहुचर्चित भाजी मंडई बांधण्यासाठी रस्ता व आरक्षणात बदल करण्यासाठी कामी तातडीने कार्यवाही करा, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्‍नांसाठी शिवसेना आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांनी महापालिका आयुक्त यांच्याबरोबर चर्चा केली. त्यावेळी आयुक्तांनी तातडीने प्रश्‍न सोडविण्याचे आदेश दिले.

बैठकीस अधिकार्‍यांची उपस्थिती
भाजी मंडईच्या विकासाचा रखडलेला प्रश्‍न, डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपूल, स्मशानभूमी ते सुभाषनगर डीपी रस्ता, सिंधी समाजाला सनद मिळण्यासाठी होत असलेला प्रशासकीय अडथळा, भाटनगर रमाबाई नगर येथील तयार इमारतींमध्ये लाभार्थ्यांना घरे देण्याचा प्रश्‍न, पिंपरीगाव पवनेश्‍वर समोरील उद्यानाचे रखडलेले आरक्षण, चिंचवड स्टेशन डी मार्ट मागे निर्माण होत असलेली झोपडपट्टी, आमदार निधीतून बसविण्यात आलेल्या सीसीटिव्हींचे पालिकेकडे हस्तांतरण, मिलिंदनगर पुनर्वसन प्रकल्पातील दोन इमारतींचा रखडलेला प्रश्‍न आणि अजंठानगर पुनर्वसन प्रकल्पातील अडथळे आदी विषयांवर यावेळी सुमारे दोन तास चर्चा झाली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, शहर अभियंता अंबादास चव्हाण, विकास अभियंता प्रवीण तुपे, उपशहर अभियंता राजन पाटील, नगररचनाकार प्रशांत ठाकूर सर्व प्रभाग अधिकारी, वास्तु विशारद सल्लागार, नगर भूमापन अधिकारी प्रशांत भोसले आदी उपस्थित होते.