प्रलंबित प्रश्‍नांबाबत आज मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील महत्त्वपुर्ण प्रश्‍नांवर नागपूरमध्ये पालकमंत्री गिरीष बापट यांच्या अध्यक्षतेखाली आमदार व महापालिका पदाधिकार्‍यांची एकत्रित बैठक सोमवारी घेण्यात येणार आहे. यामध्ये मेट्रो, पाणी पुरवठा, रिंग रोड आदी प्रश्‍नांवर चर्चा करण्यात येणार आहे. प्रलंबित प्रश्‍न प्राधान्याने सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली जाणार आहे. हिवाळी अधिवेशन असल्याने संपूर्ण मंत्रीमंडळ नागपूरलाच असून महापालिकेतील अधिकारी रविवारी रात्री तिकडे निघाले आहेत.

अनेक प्रश्‍न रेंगाळलेले
शहरातील महत्वपुर्ण प्रश्‍न आजही प्रलंबित आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर शहराचे कारभारी म्हणून पालकमंत्री गिरीष बापट हे लक्ष घालत आहेत. परंतु, आजही महापालिकेचे विविध प्रश्‍न रेंगाळलेले अवस्थेत आहेत. केंद्रासह राज्यात भाजपचे सरकार असूनही महापालिकेचे प्रश्‍न सुटलेले नाहीत. त्यामुळे शहरात नाराजी सुर उमटला आहे. शहरात पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रोचे काम करावे, यासाठी विविध संघटना पाठपुरावा करीत आहेत.

महापौरांसह शिष्टमंडळ रवाना
आंद्रा-भामा आणि आसखेड धरणातून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे, बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्प मार्गी लावणे, शास्तीकर, रिंग रोड आदी शहरातील महत्वाच्या प्रश्‍नासंबंधी पालकमंत्री गिरीष बापट यांच्या समवेत येत्या दोन दिवसात भाजपचे आमदार व महापालिका पदाधिकार्‍यांसमवेत बैठक घेवून चर्चा करणार आहेत. त्यानंतर पालकमंत्री बापट यांच्या नेतृत्वाखाली महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह आदी पदाधिकार्‍यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. हिवाळी अधिवेशनात शहरातील महत्त्वाचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहेत.