प्रलंबित मागण्यांसाठी पालिका कर्मचार्‍यांची नववर्षाच्या प्रारंभी राज्यव्यापी संपाची हाक

0

भुसावळ- पालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, रोजंदारी कर्मचार्‍यांना कायम करावे यासह विविध मागण्यांबाबत शासनाने दखल घेण्याचे आश्‍वासन देवूनही ते न पाळल्याने राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील कर्मचार्‍यांनी 1 जानेवारी रोजी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात भुसावळ पालिकेचे सर्व कर्मचारी सहभागी होणार असल्याचे नगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजू खरारे यांनी कळवले आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीने 28 नोव्हेंबर रोजी मागण्या पूर्ण न झाल्याने सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन करतील, अशी नोटीस बजावली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भुसावळ पालिकेसह राज्यभरातील पालिकांमध्ये 15 डिसेंबरला निदर्शने करण्यात आली. यानंतर 19 व 20 डिसेंबरला नगरविकास विभागात कर्मचार्‍यांची बैठक झाली. मात्र ठोस निर्णय झालेला नाही.

या मागण्यांसाठी राज्यव्यापी संपाची हाक
नवीन नगरपंचायत नगरपरिषद सफाई व इतर कर्मचारी समावेशन करावे, कंत्राटी व रोजंदारी कामगार यांना किमान वेतन देणे, अनुकंपा आणि वारसा हक्क प्रकरणे तत्काळ मंजूर करणे, डीसीपीएस योजना तत्काळ कार्यान्वित करणे, बदली धोरणात बदल करणे आदींसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी राज्यव्यापी संपाचा इशारा देण्यात आला आहे.