प्रलंबित मागण्यांसाठी 30 दिवसांचा अल्टिमेटम

0

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता 30 दिवसात न केल्यास कर्मचारी संघटना केव्हाही आक्रमकपणे तीव्र आंदोलन करेल असा निर्वाणीचा इशारा नगरपरिषद कर्मचारी संघाने दिला आहे. भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गुलाब भेगडे आणि कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिलीप वाडेकर यांनी मुख्याधिकारी वैभव आवारे आणि नगराध्यक्षा चित्रा जगनाडे याना कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांचे स्मरणपत्र नुकतेच दिले आहे. त्या स्मरणपत्रात अखेरचा निर्वाणीचा इशारा देण्यात आलेला आहे.

…या आहेत मागण्या
नगरपरिषदेमधील कर्मचार्‍यांना सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगतीचा लाभ देण्यात यावा (12 ते 24 वर्षे सेवा पूर्ण झालेल्यांना), नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील रिक्त जागा त्वरित भराव्यात. वैद्यकीय सेवा सुविधा पुरवावी. सफाई कर्मचार्‍यांना निवासासाठी स्वतंत्र घरे उपलब्ध करावीत. आस्थापनेवरील कर्मचार्‍यांना कायम करावे. वर्ग 4 चे कर्मचारी हे वर्ग 3 च्या पदावर काम करतात त्यांना पदोन्नती मिळावी. आस्थापनेवरील कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना दरमहा 1 तारखेला वेतन मिळावे. केंद्राप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या कर्मचार्‍यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.

…2013पासून दुर्लक्ष
कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांचे स्मरणपत्र व निवेदन कर्मचारी संघाने मुख्याधिकारी वैभव आवारे आणि नगराध्यक्षा चित्रा जगनाडे याना दिले आहे. कर्मचारी संघटना ही 2013 पासून आपल्या मागण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, पदाधिकारी आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नाराजीचा सूर आहे. मागण्या 30 दिवसात पूर्ण केल्या नाहीत तर कामगार संघ आक्रमक तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे. या निवेदनाच्या प्रती उपनगराध्यक्ष, सत्तारूढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता तसेच तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.