जळगाव । जळगावकडून जामनेरकडे जाणार्या प्रवाशी रिक्षाला चिंचखेड्याजवळ मालवाहू बोलेरोची समोरासमोर धडक दिल्याने रिक्षातील चालकासह अन्य दोघे जखमी झाल्याची घटना दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली असून तिघे जखमींना 108 ने तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून दोघांना खासगी रूग्णालयात दाखल केले आहे.
अशी घडली दुर्घटना
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशी रिक्षा क्रमांक (एमएच 19 एएक्स 6879) जळगावकडून जामनेरकडे जाण्यासाठी चालक रिकामा निघाला त्यानंतर नेरी येथून दोन प्रवशींनी बसवून चिंचखेडा गावाजवळ समोरून येणार्या मालवाहू बोलेरो क्रमांक (एमएच 19 बीएम 1801) ने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने रिक्षातील चालक हेमंत समाधान महाजन (वय- 21) रा. जामनेर व राहुल सुधाकर जोशी (वय-40)रा. जामनेर आणि अनिता विजय पाटील (वय-30) रा. हिवरखेडा हे गंभीर जखमी झाले. त्यांना 108 च्या रूग्णवाहिकेतील डॉ. जुगल वाडीले आणि चालक दत्ता पाटील यांनी तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. चिंचखेडा येथे झालेल्या घटनेनंतर तिघांना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान यातील दोघे प्रवाशी यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयातून खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.