प्रवासी मजुरांसाठी कोणत्याही जिल्ह्यांतून धावणार श्रमिक एक्सप्रेस

0

नवी दिल्ली – देशातील विविध भागात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी रेल्वे कोणत्याही जिल्ह्यातून श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यास तयार आहे, अशी मोठी घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांना नोडल अधिकार्‍यांमार्फत कामगारांची यादी व त्यांच्या ठिकाणांच्या तपशिलासह अर्ज करावा लागणार आहे. रेल्वेमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्यांच्या नोडल अधिकार्‍यांची यादीही जोडली आहे.

रेल्वेमंत्री गेल्या काही दिवसांपासून मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडण्यासाठी राज्य सरकारांच्या संपर्कात आहेत. विशेषतः राजस्थान, झारखंड आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांना त्यांच्याकडे अडकलेल्या प्रवासी मजुरांची माहिती द्यावी अन् नोडल अधिकार्‍यांमार्फत अडकलेल्या प्रवाशांची नावे द्यावीत, असेही आवाहनही रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आले
रेल्वे विभागाच्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांत दररोज दोन लाखांहून अधिक कामगारांना त्यांच्या राज्यांत पोहोचवण्यात आलं आहे. ही क्षमता येत्या काही दिवसांत तीन लाखांपर्यंत पोहोचेल. आतापर्यंत धावणार्‍या कामगार विशेष गाड्यांपैकी ३८७ गाड्या एकट्या उत्तर प्रदेशमध्ये चालवण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशने ५२६ गाड्या चालवण्यास मान्यता दिली आहे. बिहारमध्ये २६९ ट्रेन आणि मध्य प्रदेशसाठी ८१ गाड्या धावल्या आहेत. तसेच झारखंडसाठी ५०, ओडिशासाठी ५२ , राजस्थानसाठी २३आणि बंगालसाठी ९ श्रमिक एक्स्प्रेस चालवण्यात आल्या आहेत.