प्रविण कश्यप यांच्या ठुमरी गायनाने रसिक मंत्रमुग्ध!

0

जळगाव । अनूभूति निवासी स्कूलचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अनुभूती निवासी स्कूलच्यावतीने 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान स्वरानुभूति संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन बाबा खानेरे, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, सुप्रसिद्ध खयाल एवंम ठुमरी गायक प्रविण कश्यप, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य जे.पी.राव, आकाश विश्वास यांच्या हस्ते झाले.

आज होणार प्रसिद्ध खयाल गायक पं.त्रिपाठी यांचे कलाविष्कार
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी जैन उदयोग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते सुप्रतिक सेन गुप्ता (कलकत्ता) यांना लयानुभूती, पं. पृथ्वीराज मिश्रा (अहमदाबाद) यांचा तालानुभूती सन्मान देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रख्यात वाद्य निर्माते भारत काकडे (पुणे) यांचादेखील सन्मान यावेळी करण्यात आला. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या हस्ते लखनऊ येथील प्रसिद्ध खयाल एवंम ठुमरी गायक प्रविण कश्यप यांना स्वरानुभूति, अनुभूति स्कूलचे कला विभागातील शिक्षक तन्मय कुंडू यांना स्वरानुभूती सन्मान देऊन गौरविण्यात आले. यावेळी अनुभूति स्कूलचे संगीत शिक्षक निखील क्षिरसागर यांनी हा महोत्सव घेण्यामागची भूमिका विशद केली. आज शेवटच्या दिवशी दिल्लीचे प्रसिद्ध खयाल गायक पं. आशिष नारायण त्रिपाठी कलाविष्कार दाखवणार असून त्यांना अहमदाबादचे हर्मोनियमवादक पं. पृथ्वीराज मिश्रा व भुवनेश्वरचे आकाश बिश्वास यांची साथसंगत लाभेल. याचबरोबर जबलपूरच्या विदुषी निलांगी कलंत्रे हे कथ्थक नृत्य सादर करणार असून त्यांना अमृतेश शांडिल्य यांची तबला संगत लाभणार आहे.

जुगलबंदीने कार्यक्रमात रंगत
लखनऊ येथील प्रसिद्ध खयाल एवंम ठुमरी गायक प्रविण कश्यप, हर्मोनियमवादक निखील क्षिरसागर व भुवनेश्वर येथील आकाश बिश्वास यांनी आपला अप्रतिम कलाविष्कार सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. अहमदाबादचे पं. पृथ्वीराज मिश्रा, हर्मोनियमवादक अमृतेश शांडिल्य व भुवनेश्वर येथील आकाश बिश्वास यांच्यात रंगलेल्या जुगलबंदीने कार्यक्रमात रंगत आणली.