जळगाव । महापालिकेच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळे दोन महिन्यात ताब्यात घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आहेत. मात्र, या खंडपीठाने दिलेली मुदत संपूनही प्रशासनाने ताब्यात घेण्याची प्रक्रीय न केल्याने जनहित याचिकाकर्ते हिरालाल पाटील यांनी आयुक्तांना नोटीस दिली आहे. याअनुषंगाने महापालिका प्रशासनाकडून रेडीरेकनरनुसार गाळेनिहाय दर निश्चिती करण्यात येत असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे.
दरनिश्चितीच्या कामास प्रारंभ
महापालिकेचे मालकीच्या 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली आहे. प्रशासनाने गाळे ताब्यात न घेतल्याने हिरालाल पाटील यांच्यासह काहींनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. या सर्व याचिकांवर खंडपीठाने दोन महिन्यात गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया करावी असा निकाल दिला आहे. तरीही पालिकेकडून गाळे ताब्यात प्रक्रियेला सुरवात करण्यात आलेली नाही. याबाबत आयुक्तांना न्यालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यापूर्वीची नोटीस हिरालाल पाटील यांनी बजावली आहे. याबाबत आयुक्तांनी नोटीसीबाबत राज्य शासनाला माहिती दिली आहे. मनपा प्रशासनाने गाळे ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा लिलाव केला जाईल. त्यासाठी व्यापारी संकुलातील प्रत्येक गाळ्यांची रेडीरेकनरनुसार दर निश्चिती करण्याचे काम मनपा प्रशासनाकडून सुरू केले आहे. नगररचना विभागातील अधिकार्यांकडून हे दरनिश्चीत करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.