पिंपरी-चिंचवड-बिजलीनगर येथील पुरातन बांधावरची देवी म्हणून परिसरात प्रसिद्ध असणारी तुळजाभवानी देवीचे मंदिर आणि शिवनगरी येथील २००५ मध्ये स्थापन झालेले गणेश मंदिर या दोन्ही धार्मिक स्थळांना प्राधिकरण प्रशासनाच्या नियमबाह्य ठरवीत पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धर्मिक भावना दुखावली गेली आहेत. बिजलीनगर परिसरामध्ये त्यामुळे पुन्हा एकदा तणावाचे वातावरण तयार झाले आहे. महिला भगिनींनी यामुळे तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्राधिकरण प्रशासनाने २४ तासात मंदिर पाडण्याची कारवाईबाबत नोटीस बजावली आहे.
ही कारवाई थांबविण्यात यावी या मागणीसाठी बिजलीनगर परिसरातील नागरिकांनी प्राधिकरण कार्यालयाकडे धाव घेतली. घर बचाव संघर्ष समिती पदाधिकारी तसेच मंदिर विश्वस्त पदाधिकारी यांनी याबाबत प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके, क्षेत्रीय अधिकारी वसंत नाईक यांची भेट घेतली.याप्रसंगी घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील, समन्वयक आबा सोनवणे, संतोष चव्हाण, शुभम वाघमारे,मंदिर विश्वस्त संभाजी जराड, निलेश चोगुले, दत्तात्रय होले, सुनिल होले, विशाल घावटे, सचिन पाटील, अभिषेक जराड, शंकर चोगुले, बंटी महाजन उपस्थित होते.
प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके यांनी,” अनधिकृत मंदिरांवर कारवाई करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश असल्याने मंदिरांवर कारवाई केली जात आहे. शहरातील १२८ मंदिरांपैकी १२४ मंदिरे नियमित केली असून सदरील ४ मंदिरे उच्चदाब विजवाहिनीच्या खाली असल्यामुळे कारवाई करीत आहोत. तरीही मंदिरांचे पुनः निरीक्षण केले जाईल तसेच परिसरातील नागरिकांच्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेतली जाईल व संबंधीत बाबत रिपोर्ट प्राधिकरणाकडून मंदिर निरीक्षण समितीचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर आयुक्त यांचेकडे पाठवला जाईल असे सांगितले.