नवी मुंबई । मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेत मनपाचे आयुक्त डॉ. एन रामास्वामी यांनी स्थायी समितीसमोर शहराचा अर्थसंकल्प सादर केला असता या अर्थसंकल्पानंतर अनेकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. त्यातच कामगारांना द्याव्या लागणार्या एरियसच्या रकमेची तरतूद सदर अर्थसंकल्पनेत करण्यात न आल्याने प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात अखेर सफाई कामगारांनी रणशिंग फुंकले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यासाठी पुन्हा एकदा समाज समता कामगाराने आंदोलनाचा इशारा दिला असून, येत्या मंगळवारी महानगरपालिका प्रशासनाविरोधात चड्डी बनियन व भीक मांगो मोर्चा समाज समता कामगार संघातर्फे काढण्यात येणार आहे.
नमुंमनपा प्रशासनाने मंगळवारी स्थायी समिती पुढे सादर केलेल्या अर्थसंकल्पात कामगारांना द्याव्या लागणार्या एरियसच्या रकमेची तरतूद केली नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे कामगारांमध्ये एकच संतापाची लाट पसरली. प्रशासन जाणीवपूर्वक कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर मंगळवारी महानगरपालिका प्रशासनाविरोधात चड्डी बनियन व भीक मांगो मोर्चा समाज समता कामगार संघातर्फे काढण्यात येणार असल्याचे समाज समता कामगार संघाचे सचिव मंगेश लाड यांनी सांगितले. नवी मुंबई महानगर पालिकेत कार्यरत कामगारांना 19 मे 2017 रोजीच्या महासभेमधील बहुमताने मंजूर ठरावानुसार 24 फेब्रुवारी 2015 च्या अधिसूचनेनुसार पूर्वलक्षी प्रभावासह किमान वेतन देण्याचे मान्य करण्यात आले आहे. मात्र, निगरगट्ठ प्रशासनाने कामगारांना 1 जुन 2017 पासूनच किमान वेतन दराने वेतन दिले आहे.
परंतु 24 फेब्रुवारी 2015 ते 31 मार्च 2017 या कालावधीतला 27 महिन्यांचा एरियस कामगारांना देणे बंधनकारक असतानाही प्रशासनाने अर्थ संकल्पात कामगाराच्या एरियसच्या रकमेची तरतूद केलेली दिसून येत नाही. कचरा वाहतूक कामगारांना किमान वेतन देण्याचे आदेश आयुक्तांनी ठेकेदारास दिले असले तरी माहे जाने. 2018 चे वेतन नव्या दराने मिळेल याची शाश्वती कामगारांना नाही. स्वच्छ भारत अभियान मध्ये अहोरात्र परिश्रम करून नवी मुंबई महानगरपालिकेचा नाव लौकिक जपण्याचा प्रयन्त करणारे,जी तोड मेहनत करणार्या सफाई कामगारांना प्रशासनाने जागो जागी होल्डिंग लावून मान दिला असला तरी कामगारांचे पोट उपाशीच आहे. कामगार उपेक्षितच आहे. सन्मान नको हक्क द्या. उपाशी पोटाला घास द्या. हा सूर कामगाराच्या गोटातून उमटू लागला आहे. कामगारांबाबतीत उदासीन प्रशासनाला जाणीव व्हावी यासाठी मंगळवारी दुपारी 12.00 वाजता सिडको अर्बन हट ते महानगर पालिका येथे महानगरपालिका प्रशासनाविरोधात चड्डी बनियन व भीक मांगो मोर्चा काढण्यात येणार असल्याचे लाड यांनी सांगितले.