बारामती तालुका प्रशासनाच्या वतीने शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन
बारामती : प्रशासन आणि नागरिक यांच्या सुसंवादातूनच नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक होऊ शकेल. बारामती तालुका प्रशासनाने विस्तारीत समाधान योजनेमार्फत केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी केले. बारामती तालुका प्रशासनाच्या वतीने महाराजस्व अभियान 2018-19 नुसार विस्तारीत समाधान योजनेंतर्गत शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
नागरिकांच्या समस्यांचे वेळेतच निराकरण होणे महत्त्वाचे आहे. शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले, शेतकर्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्याकरीताचे अर्ज वेळेत निकाली काढा. सध्या अशा मागण्यांच्या अर्जांचे प्रमाण वाढले आहे, परंतु यादृष्टीने त्याची सोडवणूक करताना प्रशासन भरीव काम करीत आहे. प्रशासनाने आणि नागरिकांनी याकरीता आपापसात सुसंवाद ठेवण्याची गरज आहे, असे देवकाते यांनी पुढे सांगितले. भरत खैरे, राहूल भापकर, राहुल तावरे, प्रमोद काळे याप्रसंगी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये तहसिलदार हनुमंत पाटील यांनी या कार्यक्रमाचे स्वरुप सांगून यापुढील काळात तालुक्याच्या विविध ठिकाणी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. मोरगावचे सरपंच निलेश केदारी यांनी आभारप्रदर्शन केले.
जागेवरच मिळावा योजनांचा लाभ
समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना वारंवार तालुक्याच्या ठिकाणी यावे लागू नये. तसेच शासकीय योजनांच्या लाभापासून कोणताही ग्रामस्थ वंचित राहू नये. त्यांच्याकरीता असलेल्या योजनांचा त्यांना प्रत्यक्ष जागेवरच लाभ मिळावा, या हेतूने विस्तारीत समाधान योजनेतंर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले. मुलांच्या जातीचे तसेच रहिवासी प्रमाणपत्र हे शालेय प्रवेशावेळीच मिळवावेत. तसेच याकरीता मुख्याध्यापकांनी लक्ष घालावे. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ वृध्द, अपंग, विधवा यांना मिळण्याकरीता संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच तालुका प्रशासन करीत असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
अंगणवाड्यांना टॅबचे वाटप
मोरगाव ग्रामपंचायतीमार्फत 14 व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीतून 7 अंगणवाड्यांना टॅब, स्वयंपाकाची भांडी, खेळणी तसेच वंचित विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. जातीचे दाखले, दुबार रेशन कार्ड, झिरो बॅलन्स खाते, 7/12 दाखल्यांचे वाटप, माती परिक्षण आदी सेवांचे दाखले यावेळी नागरिकांना देण्यात आले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी कृषी, पुरवठा, सामाजिक अर्थसहाय योजना, पंचायत समिती, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, आधारकार्ड, पाटबंधारे, महावितरण इ. विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच या स्टॉलमार्फत नागरिकांना योजनांची माहिती देऊन अर्ज भरून घेण्यात आले.