प्रसिद्ध ‘मगनलाल’ चिक्कीचीही तपासणी

0

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) लोणावळ्यातील मगनलाल चिक्कीला मंगळवारी नोटीस दिली. चिक्कीचा प्रत्येक घास खाण्यास सुरक्षित असेल, अशी प्रयोगशाळेची मोहर उमटेपर्यंत विक्री करू नये, असे नोटिसीत बजावण्यात आले आहे. अन्नसुरक्षा व मानदे कायद्याच्या (एफएसएसए) आधारे ही कारवाई करण्यात आली.

लोणावळ्यातील मगनलाल चिक्कीच्या उत्पादनाची तपासणी ‘एफडीए’ने केली. चिक्कीचे उत्पादन करताना ठळक दोष आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. त्याबाबतची नोटीस मगनलाल फूड प्रॉडक्ट्सचे भागीदार अशोक अगरवाल यांना बजावण्यात आली आहे.

फूड प्रॉडक्टमध्ये विक्रीसाठी उत्पादित केलेल्या कोणत्याही अन्नपदार्थाची अन्नसुरक्षा व मानदे कायद्याने मान्यता दिलेल्या ‘एनएबीएल’ प्रयोगशाळेकडून तपासणी करत नसल्याचे या तपासणीत आढळले; तसेच या पदार्थांची विश्‍लेषण करण्याची कोणतीच सुविधा नाही. येथे उत्पादन अन्नपदार्थ मानवाने खाण्यास सुरक्षित असल्याची हमी मिळत नाही. त्यामुळे मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून अन्नपदार्थांची तपासणी होईपर्यंत विक्री करू नये, अशी नोटीस अन्नसुरक्षा अधिकारी आर. आर. काकडे यांनी बजावली. उत्पादनावरील लेबलमध्येही दोष असल्याचे या तपासणीत आढळले. त्यामुळे हे त्रुटी असलेले लेबल पॅकिंग करताना वापरू नये, असेही यात नमूद केले.