भुसावळ: मूल्यमापन चाचणी व अन्य शैक्षणिक कामाच्या बोजामुळे तालुक्यातील शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय निवड झालेली नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक परीषद व अन्य संघटनांनी प्रांताधिकारी प्रशासनाकडे केली होती मात्र प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी तंबी देताच बीएलओंनी नरमाईचे धोरण स्विकारले.
तालुक्यातील 265 बीएलओ व मुख्याध्यापकांना बजावली नोटीस
प्रांतांनी शासकीय काम करावेच लागेल, अशी तंबी देत तालुक्यातील 265 बीएलओ कर्मचारी व संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना मंगळवारी नोटीस बजावताच बीएलओ यांनी नरमाईचे धोरण स्वीकारले. बुधवारी तहसील कार्यालयातून तब्बल 197 बीएलओ यांनी मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण कार्यक्रमासाठी साहित्य ताब्यात घेेतल्याचे तहसीलदार विशाल नाईकवडे यांनी सांगितले.
आठ दिवसात करावे लागणार काम
निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार 1 जानेवारी 2018 पर्यंत मतदारयाद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 3 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर करणे क्रमप्राप्त होते. आता 30 नोव्हेंबर येण्यासाठी केवळ आठ दिवस शिल्लक असल्याने बीएलओंवर कामाची जबाबदारी वाढली आहे. काही शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश मिळालेले नाहीत.