प्राणी संग्रहालयाचे कामकाज आता उद्यान विभागाकडे

0
मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके विभागप्रमुख
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाचे कामकाज आता कर्मचार्‍यांच्या आस्थापनेसह उद्यान विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांच्याकडे विभाग प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे. दरम्यान, यापूर्वी प्राणी संग्रहालयाची जबाबदारी पशुवैद्यकीय विभागाकडे होती. निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाचे कामकाज पशुवैद्यकीय विभागाकडे वर्ग करण्यात आले होते.
सल्लागार मंडळाने दिले निर्देश
या प्राणीसंग्रहालयाच्या नियंत्रणाची जबाबदारी मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के.अनिल रॉय यांच्याकडे होती. दरम्यान, मानसेवी वन्यजीव तज्ज्ञ पुणे (वन्यजीव सल्लागार मंडळ) यांनी 29 नोव्हेंबर 2016 रोजी प्राणी संग्रहालयाचे कामकाज अतिरिक्त आयुक्त यांच्या नियंत्रणामध्ये उद्यान विभागाअंतर्गत ठेवण्याबाबत निर्देश दिले होते. ही बाब डॉ.रॉय यांनी आयुक्तांच्या निर्देशनास आणून दिली. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाचे कामकाज कर्मचार्‍यांच्या आस्थापनेसह उद्यान विभागाकडे वर्ग केले आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 67 (3)(अ) नुसार विभागप्रमुख म्हणून मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या झू अ‍ॅथॉरेटीच्या निर्देशानुसार महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयास छोटे प्राणीसंग्रहालय या वर्गाची मान्यता राखण्याकरिता क्युरेटर, संचालक, पशुवैद्यक या पदावर अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांच्याकडे क्युरेटर, संचालक, पशुवैद्ययक पदाचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे. तसेच प्राणीसंग्रहालयाचे कामकाज मुख्य उद्यान अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली त्यांना करावे लागणार आहे.