पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने मानधन तत्त्वावर नियुक्त करण्यात आलेल्या प्राणी व सर्पमित्रांच्या नियुक्ती प्रक्रियेत गडबड झाली आहे, असा आरोप लोकशाही संस्थेने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही संस्थेने महापालिकेकडे केली आहे. या विषयासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
नव्याने प्रक्रिया राबविण्याची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेने प्राणी मित्रांची भरती करण्यासाठी राबविलेली प्रक्रिया सदोष आहे. या सदोष पद्धतीमुळे अनुभवी, कुशल आणि सर्व माहिती असणार्या प्राणी मित्रांवर अन्याय होत आहे. महापालिकेने राबविलेल्या भरती प्रक्रियेमध्ये गडबड झाली आहे, असा आरोप लोकशाही संस्थेचे अध्यक्ष अजय लोंढे यांनी केला आहे. अनेक वर्षांपासून प्राणी, सर्प हाताळणे, असे कार्य करणारे, जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडणार्यांना डावलून इतरांना प्राणीमित्र म्हणून नियुक्त केले आहे. भरती प्रक्रिया शंकास्पद असल्यामुळे तातडीने रद्द करण्यात यावी. पुन्हा नव्याने निरपेक्ष व लोकशाही पद्धतीने प्राणी मित्रांची भरती प्रक्रिया लोकशाही पद्धतीने राबवावी. तसेच प्राणी व सर्पमित्रांची भरती सेवेतील संख्येत 50 टक्के वाढ करावी, अशी मागणी अजय लोंढे यांनी केली आहे.