पुणे । जिल्ह्यातील 96 प्राथमिक आरोग्य केंद्र, 539 उपकेंद्रे व 23 ग्रामीण रुग्णालयांतील औषधांची तपासणी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहै. ही समिती औषध भांडारातील औषधांची पडताळणी करणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांत आणि उपकेंद्रात औषधांचा तुटवडा असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. सी. बोरा यांच्या अध्यक्षतेखाली आणि वैद्यकीय अधिकार्यांच्या देखरेखीखाली औषध भांडारांची तपासणी केली जाणार आहे. या समितीद्वारे इ-औषधी सॉफ्टवेअर, औषध साठा नोंदवह्या तसेच भांडारामध्ये प्रत्यक्ष उपलब्ध असलेला औषधांच्या साठ्याची पडताळणी करून अहवाल सादर करण्यात येणार आहे. औषध साठ्यासमवेत लसींच्या साठ्याचीदेखील पडताळणीही करण्यात येणार आहे.
अहवाल करावा लागणार सादर
औषध साठ्यांची तपासणी करण्यासाठी प्रत्येक टीममध्ये तालुका आरोग्य अधिकारी, औषध निर्माता, डाटा एन्ट्री ऑपरेटरचा समावेश करण्यात आला आहे. तपासणी करताना नोंदवही, ई-औषधवरील साठा आणि प्रत्यक्ष साठ्याचा मेळ घालावा लागणार आहे. भांडारात ठेवलेल्या औषधांची मांडणी व सुस्थितीची नोंदही घ्यावी लागणार आहे. औषधसाठा मार्गदर्शक सूचनांचा विचार करून प्रचलित असलेल्या औषध वाटप पद्धतीमधील त्रुटी आणि त्यावरील उपाययोजनांचा अहवाल सादर करावा लागणार आहे.
विशेष मोहीम राबविणार
जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील आरोग्य अधिकार्यांची नेमणूक परस्परविरोधी तालुक्याच्या औषध भांडारांची तपासणी करण्यासाठी केली आहे. तर, जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने तालुका आरोग्य अधिकार्यांनी तपासलेल्या औषधांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे, अशी माहिती डॉ. माने यांनी दिली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि उपकेंद्रात उपलब्ध असलेल्या औषध भांडारांची तपासणी होणार आहे. औषध तपासणीमध्ये औषधांचा प्रकार, ई-औषधी, उपलब्ध स्टॉक, स्टॉकबुक आणि सद्य:स्थितीतील साठा फरक, ई-औषधी फरकाची नोंदणी फॉर्ममध्ये करण्यात येणार आहे.