प्राथमिक आरोग्य केंद्र होणार सुसज्ज

0

पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून इंदापूर तालुक्यासाठी 4 कोटी 11 लाखांचा निधी मंजूर

पुणे : जिल्हा परिषदेकडील आरोग्य विभागामार्फत इंदापूर तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी 73 लाख 1 हजार रुपये, 7 प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी 60 लाख 91 हजार, एक नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यासाठी 2 कोटी 3 लाख 60 हजार व एक नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधण्यासाठी 73 लाख 64 हजार अशी एकूण 4 कोटी 11 लाख 16 हजार रुपयांची 15 कामे मंजूर करण्यात आली असल्याची माहीती पुणे जिल्हा बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सन 2017-18 जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत काटी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. सन 2018-19 मधील लेखा शिर्षकांतर्गत इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र-उपकेंद्राची दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेस तत्पर आरोग्य सेवा पूरविण्याच्या दृष्टीने याचा लाभ होणार आहे. तालुक्यातील ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रांमध्ये दुरूस्ती, सुशोभिकरण व तसेच प्रसुतीगृहाची दुरुस्ती इ. कामांची आवश्यकता होती, अशा ठिकाणी कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. मंजूर कामांच्या निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येऊन सर्व बांधकाम दर्जेदार व गुणवत्तापूर्वक करण्यात येणार असल्याचे प्रविण माने यांनी सांगितले.

हिंगणगावसाठी 19 लाख मंजूर

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकाम व विस्तारीकरण योजनेअंतर्गत रूई प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी 7 लाख 92 हजार, सराटी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे सुशोभिकरण करणे 4 लाख, न्हावी उपकेंद्रात पेव्हर ब्लॉक बसविणे व सुशोभिकरणासाठी 4 लाख 99 हजार, रूइ उपकेंद्रात प्रसुतीगृह बांधण्यासाठी 10 लाख, गोखळी येथे नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधणे 73 लाख 64 हजार, रूई उपकेंद्रास संरक्षक भिंत बांधण्यासाठी 10 लाख, रेडणी उपकेंद्रात प्रसुतीगृह बांधण्यासाठी 5 लाख, हिंगणगाव उपकेंद्रास संरक्षक भिंत व प्रसुतीगृह बांधण्यासाठी 19 लाख रूपये मंजूर करण्यात आलेले आहेत.

प्रसुतीगृहांची होणार दुरुस्ती

जिल्हापरिषद प्राथमिक आरोग्य केंद्र देखभाल व उपकेंद्र दुरूस्ती योजनेंतर्गत निरवांगी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील प्रसुतीगृहाची दुरुस्ती करण्यासाठी 3 लाख, सणसर केंद्राची दुरूस्ती व सुशोभिकरणासाठी 9 लाख, लासुर्णे केंद्राची दुरूस्ती व सुशोभिकरणासाठी 8 लाख, बीजवडी केंद्राची दुरूस्ती व सुशोभिकरणासाठी 8 लाख 1 हजार, तर जिल्हापरिषद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकाम व विस्तारिकरण योजनेअंतर्गत काटी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यासाठी 2 कोटी 3 लाख 60 हजार रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

गरीबांना उत्कृष्ट सेवा पुरविण्यास कटीबद्ध

पळसदेव केंद्रात प्रसुतीगृह बांधणे व जिल्हा परिषद निधीमधून लासुर्णेतील शवविच्छेदनगृहाची दुरुस्ती करणे, अशा प्रकारची विविध 15 कामे जिल्हा परिषदेतर्फे मंजूर करण्यात आली आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाकडून 4 कोटी 11 लाख 16 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता, गरीब रुग्ण यांना याद्वारे अत्यंत उत्कृष्ट सेवा पूरविण्यास पुणे जिल्हा परिषद कटीबद्ध असल्याचे पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.