लोणी काळभोर । सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने 31 डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या मौखिक आरोग्य तपासणी अंतर्गत लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सुमारे 4 हजार 500 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत असलेली रायवाडी, कदमवाकवस्ती, मांजरी बुद्रुक, महादेवनगर, साडेसतरानळी व केशवनगर या उपकेंद्रांच्या वतीने ही तपासणी करण्यांत आली आहे. आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिलेल्या माहिती नुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने व मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांचे मार्गदर्शनाखाली सदर तपासणी मोहीम सुरू असून तंबाखू, गुटका, सिगारेट, दारू आदी व्यसन करणार्यांना तोंडाचा कर्करोग होतो हि सिद्ध झाले असून असे व्यसन करणार्यांना आपल्या तोंडाचा जबडा व्यवस्थित उघडता येत नाही. महाराष्ट्र कर्करोगमुक्त करण्यांसाठी शासनाचे वतीने ही तपासणी मोहीम उघडण्यात आली आहे.
लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत असलेली उपकेंद्रांचे प्रत्येकी दोन कर्मचारी घरोघरी जाऊन प्रतिदिन 30 ते 35 रुग्णांची तपासणी आशा स्वयंसेविकांचे मदतीने करत आहेत. यांचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रांत येणा-या संशयित रूग्णांची तपासणी करण्यात येत आहे. असा कर्करोगग्रस्त रूग्ण आढळून आल्यास त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवून त्यावर मोफत उपचार करण्यांत येणार आहेत. यांसाठी सर्वानी आपली मौखिक आरोग्य तपासणी करून घ्यावी असे अवाहन लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी केले आहे.