पिंपरी-गेल्या दोन महिन्यांपासून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे वाहतूक स्वयंसेवक चाकण विभागामध्ये महत्वाच्या चौकांमध्ये तसेच उद्योगनगरी परिसरामध्ये वाहतूक व प्रदूषण समस्यांचे निरीक्षण करीत आहेत .त्याचप्रमाणे बेशिस्त वाहनचालकांना शिस्तीचे धडे देत आहेत. समिती अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय मुनोत, ऍड.विद्या शिंदे, जयेंद्र मकवाना, जयप्रकाश शिंदे,संतोष चव्हाण, अर्चना घाळी, विशाल शेवाळे,समीर चिले, अजय घाडी,बाबासाहेब घाळी, तेजस सापरिया, राजेश बाबर, सतीश मांडवे,भारत उपाध्ये, मंगेश घाग, संदीप सकपाळ,सतीश देशमुख,लक्ष्मण इंगवले,नितीन मांडवे,तुकाराम दहे, अमित डांगे आदी स्वयंसेवक सहभागी झाले होते.
सार्वजनिक बस वाहतूक कमी प्रमाणात असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.महापालिकेने सकाळच्या सुमारास बसेस च्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी होत आहे.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी चाकण परिसरातील सर्व उद्योग परिषदेमधील सभासद सदस्यांनी एकत्रित येऊन विशेष सुरक्षा रक्षकांची नेमणूक प्रमुख गर्दीच्या ठिकाणी केल्यास वाहतूक नियमन योग्य पद्धतीने राबविता येईल याबाबत विचार करावा याविषयी मार्गदर्शन केले.
विजय मुनोत यांनी रस्त्यावर कंटेनर उभे करण्यास सर्वच कंपन्या प्रशासनाने बंदी घालावी त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही याबाबत उपाययोजना राबवाव्या. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी केली.