कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील मालमत्ता कराची जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी मोठ्या थकबाकीदाराच्या दारात कचरा टाकण्यासह थकबाकीदाराचा कचरा न उचलणे आणि सोसायट्यांच्या आवारात कचऱ्याने भरलेल्या कुंड्या ठेवणे यांसारखे कठोर उपाय आयुक्तांनी सुरू केले आहेत. मात्र कर थकवणाऱ्या सोसायटीच्या गेटवर ठेवलेल्या कुंड्याची दुर्गंधी प्रामाणिकपणे कर भरणा करणाऱ्यांना सहन करावी लागत आहे. तर, दुसरीकडे तीन दिवसांपासून थकबाकीदारांच्या परिसरात कचरा टाकला जात असूनही करभरणा फारसा वाढलेला नाही.
मार्चअखेर मालमत्ताकराची १०० टक्के वसुली होत नसल्याने पालिका आयुक्तांनी थेट मोठ्या थकबाकीदारांच्या दारात शहरातील कचरा टाकण्यासह थकबाकीदाराच्या दारातील कचरा न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या कचऱ्यावर औषधाचा फवारा नियमित करून नागरिकांच्या आरोग्याला अपाय होऊ नये, याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे. मात्र परिसरात पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे रहिवासी हैराण झाले आहेत. शहरातील अनेक रहिवासी मालमत्ता कराचा वेळेत भरणा करत असतात. तर, काही सोसायट्या वारंवार नोटिसा देऊनही कराचा भरणा करत नाहीत. मात्र कर भरणारे आणि न भरणारे अशी वर्गवारी करणे पालिका प्रशासनाला जमलेले नाही.
डोंबिवली पश्चिमेकडील रामचंद्र महाजन यांच्या लाखो रुपयांच्या कराची थकबाकी असल्यामुळे प्रशासनाने त्याच्या घरासमोर कचराकुंडी आणून ठेवली असून या कुंडीतील कचरादेखील तसाच आहे. यामुळे महाजन यांना त्रास होत आहेच; मात्र समोरील रत्नसिंधू इमारतीमधील रहिवाशांनी कराचा भरणा केलेला असतानाही त्यांना नाहक दुर्गंधी सहन करावी लागत आहे.
कर न भरणा-यांवर ही कारवाई सुरुच राहणार आहे यापुढे त्यांचा कचराच उचलणार नाही. जरी कचरा टाकला तरी त्याच्या बाजुला औषध फवारणीही करतो.
ई रविंद्रंन, केडीएमसी, आयुक्त