प्रामाणिक माणसाचा ‘पक्ष’पाहू नका – अरुणभाई गुजराथी

0

चाळीसगांव — हल्ली राजकारणाबद्दल चांगले बोलले जात नाही. त्यामुळे राजकारणात किती ही चांगला माणूस आला की तो टीकेचा धनी होतो. राजकारणात अनेक जण संधीचा शोधात असतात ती ज्याला मिळाली त्याला संधीसाधू म्हणता येणार नाही. माणसाची ओळख ती त्याच्या सेवा , समन्वय व संघर्षातून होते. त्यामुळे प्रामाणिक माणसाचा “पक्ष” पाहू नका असे सडेतोड प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी केले ते आज चाळीसगावात सकाळी अकरा वाजता लोकनेते अनिलदादा देशमुख यांच्या अठराव्या स्मृतिदिनानिमित्त अनिलदादा विचार मंच च्या वतीने राजपुत मंगल कार्यालयात आयोजित गेली पन्नास वर्ष तालुक्याच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हयाचे माजी मंत्री आमदार सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार दिलीप वाघ, राजीव देशमुख, साहेबराव घोडे, ईश्वर जाधव, माजी महापौर गफ्फार मलिक , उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश संगितराव पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण , माजी जी.प. सदस्य सुभाष चव्हाण, जी.प.गटनेते शशीभाऊ साळुंखे , कांग्रेस चे जिल्हा सरचिटणीस अशोक खलाणे, शिवाजी राजपुत, प्रदीप देशमुख, पद्मजा देशमुख उपस्थित होते. यावेळी सहकार महर्षी उदेसिंग पवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. अरुण गुजराथी पुढे म्हणाले की माणसाची ओळख ही त्याच्या सेवेतून झाली पाहिजे. त्यामुळे राजकारणात “सेवा” असली पाहिजे. कै. देशमुख हे नगराध्यक्ष असताना मी चोपडा पालिकेचा नगराध्यक्ष होतो तेव्हा आमच्यात विकासावर चर्चा व्हायची आमच्याकडे गेल्या उन्हाळ्यात अठरा दिवसात अर्धा तास पाणी आले मात्र चाळीसगावात पाणीच पाणी होते. नवी चेतना नवी ऊर्जा त्यांच्यात होती. म्हणून अनिल दादा चे नाव घेताच चाळीसगाव ची ओळख येते. असे काम करा की आपल्या नावाने गाव ओळखले जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रास्तविक राजीव देशमुख तर तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पाचशे पेक्षा अधिक भूमिपुत्रां चा यथोचित गौरव करण्यात आला.