चार जण जखमी
लोणखेडा बायपास रस्त्यावरील घटना
शहादा : लोणखेडा बायपास रस्त्यावरील श्री विष्णू नारायण मंदिराजवळ अपघात होवून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा. अनिल देशमुख जागीच ठार झाले. गाडीतील अन्य चौघे किरकोळ जखमी झालेत. दरम्यान, दै.‘जनशक्ति’ ने 24 मे रोजी कोलदा ते खेतिया रस्ता मृत्यूचा सापळा अशा ठळक मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा.अनिल देशमुख हे आपले खासगी वाहन मारुती वॅग्नार (क्र.एमएच 18 एजे 5466) ने आपल्या कुटुंबीयांसमवेत सक्राळी, ता.पानसेमल (म.प्र.) येथे नातेवाईकांना पाहण्यासाठी जात असताना लोणखेडा खेतीया रस्त्यावरील श्री विष्णू नारायण मंदिराजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला. रस्त्याच्या उजव्या बाजूकडून अचानक तीन चार महिला रस्ता ओलांडत असल्याचे गाडी चालक कुलदीप बटेसिंग रावल यांना दिसल्याने गाडीचा ब्रेक दाबला. गाडी जागीच थांबल्याने तीने तीन ते चार पलटी खाल्ल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रस्त्यालगतच्या ब्रासमध्ये पडले. त्यामुळे गाडीत पुढे बसलेले अनिल देशमुख यांच्या डोक्याला मार बसल्याने नाका तोंडातून रक्त वाहत होते. त्यांना लागलीच रस्त्यावरील नागरिकांनी शहरातील सार्थक क्रिटीकेअर सेंटर येथे आणले. तेथे डॉ. त्यांना मृत घोषीत केले. मयताच्या नातेवाईकात चार जण जखमी झाले. त्यात कुलदिप भटेसिंग रावल (वय-34, रा. दोंडाईचा, शालक ) यांना सार्थक हॉस्पिटल येथे तर उर्मिला अनिल देशमुख (45,पत्नी), भार्गव अनिल देशमुख (19, मुलगा), हरवाबाई बटेसिंग रावल (65 सासु) यांचा समावेश आहे. त्यांना शहादा येथील रुक्मिणी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच जि.प.सदस्य अभिजित पाटील, नगरसेवक संदीप पाटील, रवींद्र जमादार, भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाळे, कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रा.भरत देसले, समन्वयक प्रा. डी. सी. पाटील, खजिनदार प्रा. गणेश सोनवणे, तालुकाध्यक्ष प्रा.आय.डी. पाटील , प्रा. जे. बी.पवार, प्रा.डी.एन.वाघ, प्रा.पी.यु.धनगर यांच्यासह असंख्य शिक्षक व नातेवाईक हॉस्पिटलला उपस्थित होते.
घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला. प्रा. देशमुख यांच्यावर त्यांच्या मूळ गावी पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा,जि. जळगाव येथे रात्री साडे आठला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, शहादा पोलिसात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नहादे करत आहेत.