बेळगाव : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा.एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणी कर्नाटक एटीएसने एका तरुणाला अटक केली असून धारवाड न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रवीण चतूर असे या युवकाचे नाव आहे. कर्नाटक एटीएसने प्रवीण चतूर या तरुणाला सहा महिन्यांपूर्वीच ताब्यात घेतले होते. मात्र, त्याची चौकशी करून सोडून देण्यात आले होते. आज एटीएसने चतूरला पुन्हा अटक केली आहे.
गेल्या काही वर्षांत डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंतांची हत्या करण्यात आली होती. कलबुर्गी यांचा खून ३० ऑगस्ट २०१५ ला झाला. त्याला आता दोन वर्षे होऊन गेली तरी तपास ठप्प आहे. कर्नाटक सरकार अजूनही आरोपींना पकडू शकलेले नाही. दाभोलकर-पानसरे व कलबुर्गी खूनप्रकरणात एकाच विचारांच्या शक्तींचा सहभाग असल्याचा संशय वारंवार व्यक्त झाला आहे; किंबहुना हे तिन्ही खूनही एकाच रिव्हॉल्व्हरमधून झाल्याचाही संशय आहे; परंतु या तिन्ही खुनांचा सध्या तपास करणाऱ्या सीबीआय, एनआयए या तपास यंत्रणा व महाराष्ट्र शासन, कर्नाटक व गोवा शासन यांच्यामध्ये कसलाही समन्वय नाही.
या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी ‘ककोका’ कायद्यांतर्गत १२ जणांना अटक केली आहे. त्यातील पुरुषोत्तम वाघमारे याने पिस्तूल चालवल्याचा आरोप आहे. पुण्यातून अमित काळे, गोव्यातून अमित डेगवेकर यांच्यासह सुचितकुमार, केटी नवीनकुमार, मोहन नायक, मनोहर एडवे, अमित बड्डी, गणेश मिस्कीन, राजेश बंगेरा, भारत कुरणे, सुरेशकुमार अशी अन्य आरोपींची नावे आहेत. त्यातील खुनाची कबुली दिलेल्या चौघांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.