पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी- आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघ यांच्यावतीने 26 डिसेंबरला माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे. महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त होणार्या या कार्यक्रमास विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व अभिनेते विजय कदम प्रमुख पाहुणे असतील. अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार असतील, अशी माहिती प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रौप्यमहोत्सवाची सांगता
पिंपरी-चिंचवडमध्ये 1992 साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने गेल्या पंचवीस वर्षात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. यामुळे शहराबरोबरच आजुबाजुच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची उत्तम सोय आहे. स्थापनेपासून महाविद्यालयाने उत्तरोत्तर प्रगती केली आहे. महाविद्यालयीन पायाभूत सुविधा, विद्यार्थी संख्या, अध्यापन संशोधन आणि ज्ञानविस्तार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा विकास या ध्येयानेे मार्गक्रमण केले आहे. महाविद्यालय अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असून महाविद्यालयाला व प्राध्यापकांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. नऊ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके मिळालेली आहेत. विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील अनेक शिबिरांमध्ये, तर प्राध्यापक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये सहभागी असतात, असे चासकर यांनी सांगितले.
पुस्तक प्रकाशन, विद्यार्थी सत्कार
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या माजी विद्यार्थ्यांचे अनुभव असलेल्या ‘यशोगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन मेळाव्यात करण्यात येणार आहे. तसेच विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन उपप्राचार्य डॉ. निलेश दांगट, डॉ. अभय खंडागळे, डॉ. तुषार शितोळे, रजिस्ट्रार अनिल शिंदे, माजी विद्यार्थी संघाच्या समन्वयक डॉ. सुजाता टापरे करत आहेत. विद्यार्थी नावनोंदणीसाठी मोबाइल अॅप तयार केले आहे. माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.