साक्री । राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार दहिवेलच्या (ता.साक्री) उत्तमराव पाटील महाविद्यालयास तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून याच महाविद्यालयाचे प्रा.डॉ सचिन नांद्रे यांना जाहीर झाला आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे हा पुरस्कार देण्यात आला. यानिमित्त पंचायत समिती सदस्य उत्पल नांद्रे यांनी साक्री येथे प्रा.नांद्रे यांचा सत्कार केला.
प्रा.डॉ.सचिन नांद्रे यांनी 2011 ते 2013 पर्यंत सहायक कार्यक्रम अधिकारी म्हणून तर 2014 ते 2017 पर्यंत कार्यक्रम अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. या कालावधीत विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकांना त्यांनी प्रेरणा दिली. साक्षरता अभियान, बेटी बचाओ-बेटी पढाओ, राष्ट्रीय एकात्मता, आपत्ती व्यवस्थापन, एड्स जनजागृती, वृक्षारोपण, स्वच्छ भारत अभियान हे कार्यक्रम नियमित घेतले. विशेष हिवाळी शिबिरात सलग तीन वर्ष दत्तक गाव छडवेल-पखरुण येथे फड बागायतीसाठी असलेल्या बांधांमधील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवून रब्बी पिकांसाठी उपयोगात आणली, त्यासोबतच परिसरातील जलयुक्त शिवार अभियानात दोन बांध तयार केले.
विशेष हिवाळी शिबिरात दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करुन समाजात एक चांगला संदेश दिला. एक मूठ धान्य ही संकल्पना राबवली, याची दखल विद्यापीठाने घेतली असून उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार प्रा.नांद्रे व दहिवेल महाविद्यालयास जाहीर केलाआहे.
याबद्दल पंचायत समिती सदस्य उत्पल नांद्रे यांनी त्यांचा सत्कार केला. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन अरविंद पाटील, सदस्य राजेंद्र पाटील, वसंतराव पाटील, सचिव प्राचार्य एल. ए. नांद्रे यांनी समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.डी.बोरसे, उपप्राचार्य सुरेश अहिरे यांचे मार्गदर्शन मिळाले. या पुरस्कारानंतर नांद्रे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.