‘प्रिमियर’बाबत आठ दिवसात कार्यवाही करणार

0

कामगार मंत्री निलंगेकर यांचे आश्‍वासन

पिंपरी : असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करावी, तसेच चिंचवड येथील प्रिमियर कंपनीतील कामगारांचे प्रश्‍न सोडवावेत. या विषयावर कष्टकरी संघर्ष महासंघाचे शिष्टमंडळाने कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेतली. प्रियियर कामगारांबाबत येत्या आठ दिवसात कंपनी अहवाल मागवून घेऊन योग्य कार्यवाही करू, असे आश्‍वासन निलंगेकर यांनी दिले. यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, उमेश डोर्ले, मधुकर वाघ, ओमप्रकाश मोरया, दिनेश राठोड, जयंत चव्हाण उमेश साळवी आदी उपस्थित होते.

प्रीमिअर कंपनीतील सर्व कामगार कंपनीच्या प्रगतीसाठी परिश्रम घेत आहेत. मात्र, कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांचे वेतन देत नाही. कंपनीची आर्थिक स्थिती भक्कम असताना ही वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालण केले जात नाही. वेतन न मिळाल्याने, आर्थिक विवंचनेत कामगार सापडला आहे. कामगारची परिस्थिती नाजूक असून दोन वेळेच्या जेवणाचे अवघड झाले आहे. अनेकांची कर्जाची हप्ते थकलेली आहेत कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची फीस भरणे अवघड झाले आहे, अशाप्रकारे आर्थिक विवचंनेत कामगारांना टाकून व्यवस्थापन अन्याय करत आहे.

यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी असंघटित कामगारांचे असुरक्षित जीवन व कामगारांचे वाढते अपघाती मृत्यू याबाबत कामगार मंत्री यांचे लक्ष वेधले. राज्यातील असंघटीत क्षेत्रात काम करणार्‍या 122 घटाकातील कामगारांसाठी सुरक्षा व योग्य न्याय देण्याचे दृष्टीने एकच महामंडळ असावे म्हणून शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत शासनाने घोषणा केली. मात्र, पुढे कार्यवाही झाली नाही ती करावी अशी मागणी केली.