* आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली चर्चा
पिंपरी : चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेची महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी माध्यमिक शाळा स्थलांतरित करण्यात येत आहे. शाळेतील साहित्य दळवी नगर येथील शाळेत हलविण्यात येत आहे. शाळा स्थलांतरणाला पालकांनी विरोध केला आहे. याबाबत शहरातील लोकप्रतिनिधींनी पालकांनी शाळा स्थलांतरणाचा विषय समजून घ्यावा. येणार्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनासोबत चर्चा करावी, असे आवाहन केले आहे. मात्र पालकांनी महापालिकेने आपला निर्णय रद्द करावा, यावर ठाम आहेत. त्यामुळे आता महापालिकेविरूद्ध पालक अजून संतापले आहेत. महापालिकेच्या आडमुठ्या धोरणावर पालकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
स्थलांतरित झाल्याचा फलक
प्रेमलोक पार्क येथील शाळेतून दळवीनगर येथील शाळेत बाक हलविण्याचे काम आज (रविवारी) सुरु केले आहे. तत्पूर्वी शाळा प्रशासनाने शाळा स्थलांतरित झाल्याचा फलक शाळेच्या परिसरात लावला असून मुख्य दरवाजा बंद केला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक शाळेच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर रस्त्याच्या बाजूला ठिय्या मांडून बसले आहेत. शाळा प्रशासनाने पालकांना आंदोलन न करण्याबाबत विनंती केली असून पालक कुणाचेही ऐकण्याच्या तयारीत नाहीत. दरम्यान, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेवक नामदेव ढाके आणि सचिन चिंचवडे यांनी पालकांशी चर्चा केली आहे. चर्चा केलेल्या सर्व लोकप्रतिनिधींनी देखील पालकांना समजून घेण्याचे आवाहन केले आहे.
पालकांनी सहकार्य करावे
दळवीनगर येथे शाळा सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी पालकांनी सहकार्य करावे. शाळेच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा करणे, विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करणे आणि परिसराला सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने शाळा आणि महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, दळवीनगर येथील शाळेसमोर विद्युत रोहित्र (डीपी), बाजूला मोठा नाला, सार्वजनिक शौचालय, समोर रेल्वे रूळ आहे. तसेच ही लोकवस्ती असुरक्षित आहे. त्यामुळे पालक शाळा स्थलांतरित करण्यास विरोधात करीत आहेत.