आमदार गिरीश बापट यांचे प्रतिपादन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय येत्या 15 ऑगस्टपर्यंत चिंचवड येेथील प्रेमलोक पार्क पालिकेच्या शाळेत तात्पुरत्या स्वरूपात कार्यान्वित करण्यात येईल. तसेच मुख्यालयासाठी निगडीतील पालिकेच्या शाळा क्रमांक 1 मध्ये तर अतिरिक्त पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांचे कार्यालय स्पाईन रोड येथील 3 क्लब हाऊसमध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी दिली.
1 मे चा मुहूर्त चुकला
शहरासाठी स्वतंत्र पोलीस युक्तालयाला राज्य सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर 1 मे ला आयुक्तालय सुरू करण्यात येणार होते. मात्र, जागा निश्चित झाली नसल्यामुळे आयुक्तालय सुरू होऊ शकले नाही. त्यानंतर पालकमंत्री बापट यांनी आयुक्तालयासंदर्भात शनिवारी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या कार्यालयात बैठक घेतली. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर आदी उपस्थित होते.
तात्पुरत्या स्वरूपात आयुक्तालय
पालकमंत्री बापट म्हणाले की, तात्पुरत्या स्वरूपात चिंचवड येथील प्रेमलोक पार्क शाळेत आयुक्तालय सुरू करण्यात येईल. निगडीतील शाळा क्रमांक 1 मुले येथे मुख्यालय व राज्य राखीव पोलीस दलाचे कार्यालय असेल तर चिखलीतील स्पाईन रोड येथील तीन क्बल हाऊस येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांचे कार्यालय असेल. या तिन्ही जागेसंदर्भातील अहवाल येत्या 8 ते 10 दिवसांत तयार करून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात येईल. सदर जागेच्या विविध परवानग्या घेण्यात येतील. त्यानंतर फर्निचरसह आदी कामाला प्रत्यक्षात सुरूवात करण्यात येईल. तसेच चिखलीत येत्या महिन्याभरात पोलीस ठाणे उभारण्यात येईल, असेही बापट यांनी सांगितले.
बापट पुढे म्हणाले की, हे आयुक्तालय तात्पुरत्या स्वरूपात उभे करण्यात येणार आहे. कायमस्वरूपी आयुक्तालयासाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे.
पिंपरीतील एच. ए. मैदान व मोशीतील बाजारपेठेजवळील जागे संदर्भात बैठकीत चर्चा झाली. लवकरच यातील एका जागेवर आयुक्तालय उभे कर÷ण्याबद्दल बैठकीत चर्चा झाली.