प्रेमसंबंध ठेवून लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

0

चिंचवड : लग्नाचे आमिष दाखवत प्रेमसंबंध ठेवून प्रियकराने विवाहास नकार दिल्याने एका 18 वर्षीय तरुणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी (दि. 5) रोजी दुपारी एकच्या सुमारास महात्मा फुलेनगर, चिंचवड येथे घडला होता. याप्रकरणी संशयित आरोपी विशाल विष्णू लष्करे (वय 19, रा. रामनगर, चिंचवड) याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो पसार आहे. याबाबत आत्महत्या करणार्‍या तरुणीच्या आईने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध
संशयित आरोपी विशाल हा सराईत गुन्हेगार आहे. तरुणीशी गेल्या सहा महिन्यांपासून त्याचे प्रेमसंबंध होते. विशालने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर पीडित तरुणीने त्याच्याकडे लग्न करण्याची मागणी केली. मात्र, त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे ती नैराश्यात गेली. 5 रोजी तिने नैराश्यातून राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. 10 मार्च रोजी उपचारदम्यान तिचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.