प्रेयसीची सोन्याची अंगठी घेऊन प्रियकराचे पलायन

0

मुंबई  – प्रेयसीची सोन्याची अंगठी घेऊन प्रियकराने पलायन केल्याची घटना खार परिसरात उघडकीस आली ओ. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन प्रियकराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या आरोपीचा पोलीस सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने शोध घेत आहेत. ही तरुणी दादर परिसरात राहत असून ती उच्चशिक्षित आहे. काही महिन्यांपूर्वी तिने लग्नाच्या संकेतस्थळावर स्वतचे नाव नोंदविले होते. याच संकेतस्थळावर या तरुणानेही लग्नासाठी नाव नोंदविले होते. या संकेतस्थळावर या दोघांची ओळख झाली होती.

ओळखीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले होते. गेले वर्षभर ते दोघेही एकमेकांशी फोन आणि व्हॉटअपच्या माध्यमातून संपर्कात होते. फोनवर बोलता बोलता या दोघांनीही प्रत्यक्षात भेटण्याचे ठरविले होते. ठरल्याप्रमाणे ते दोघेही काल दुपारी खार येथील कॉर्टर रोडवरील एका कॉफी शॉपमध्ये आले होते. प्रियकराला भेटायचे आहे म्हणून या तरुणीने तिचे सर्व दागिने घातले होते. कॉफी शॉपमध्ये तिच्या अंगावरील दागिने पाहिल्यानंतर त्याला धक्काच बसला होता. काही वेळाने त्याने तिच्याकडे तिची अंगठी मागितली होती. तिनेही त्याला अंगठी दिली. त्यानंतर ते दोघेही तिथे गप्पा मारीत बसले होते. यावेळी त्याला कोणाचा तरी फोन आला होता. फोनवर बोलता बोलता तो बाहेर निघून गेला आणि परत आला नाही. तिने त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल फोन बंद होता. आपली फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच तिने खार पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तिथे उपस्थित पोलिसांना तिने घडलेला प्रकार सांगून आरोपी प्रियकराविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. त्याचा मोबाईल क्रमांक तसेच कॉफी शॉपमधील सीसीटिव्ही फुटेजवरुन आरोपीचा पोलिसांनी शोध सुरु केला असून लवकरच तो पकडला जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.