‘प्रोफेशनल’ काँग्रेस

0

काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी प्रोफेशनल काँग्रेसच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना आपल्या पक्षाकडे आकृष्ट करण्याचा केलेला प्रयत्न हा भलेही सोशल मीडियात हास्यास्पद बनू शकतो. मात्र देशभरात एकंदरीतच नोटाबंदी आणि जीएसटी पश्‍चातच्या कालखंडात त्रस्त झालेल्या व्यावसायिकांना याद्वारे एकत्रीत करण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर गांभिर्याने आणि अर्थातच दूरगामी दृष्टीकोन ठेवून काम केल्यास लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या काँग्रेस पक्षाची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर गलीतगात्र झालेला हा पक्ष अजूनही सावरलेला नसल्याचे अनेकदा स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे. यातच अलीकडेच बिहारमध्ये सत्तेतून बाहेर झाल्यानंतर गुजरातमध्ये पक्षातून सुरू झालेले ‘आऊटगोइंग’ काँग्रेससाठी धोक्याची घंटा बनले आहे. सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अहमद पटेल यांनी कधी काळी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सीबीआयच्या माध्यमातून खूप वेळेस सतावल्याचा वचपा काढण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे दिसून येत आहे. यातून काँग्रेस पक्षाचा चाणक्य समजल्या जाणार्‍या पटेल यांना राज्यसभेत एंट्री मिळू नये म्हणून या पक्षाचे आमदार फोडण्याचा नवीन पॅटर्न भाजपने सुरू केला आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमिवर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी आपल्या पक्षाची ‘प्रोफेशनल काँग्रेस’ या नावाने नवीन शाखा सुरू करण्याची केलेली घोषणा ही माध्यमांमधून फारशी झळकली नाही. खरं तर राहूल यांना मीडिया फारसे गांभिर्याने घेत नाही. आणि त्यातही सर्व परिस्थिती विरूध्द असतांना या घोषणेत नाविन्य तरी काय? असा प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो. तथापि, प्रोफेशनल काँग्रेसची स्थापना ही अनेक अर्थांनी लक्षणीय आहे. वास्तविक पाहता प्रत्येक पक्षाच्या अनेक आघाड्या कार्यरत असतात. अगदी जाती-जमातीसह विविध व्यवसायांशी निगडीत (उदा. वैद्यकीय, विधी वगैरे) सेल कार्यरत आहेत. अलीकडेच मुंबई काँग्रेसने चक्क संत-महंत शाखेच्या कार्यक्रमाचे केलेले आयोजन चर्चेचा विषय बनले होते. यामुळे प्रोफेशनल काँग्रेमध्ये नवीन ते काय? असा प्रश्‍न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मात्र ज्या पध्दतीने या शाखेचे नियोजन करण्यात आलेय ते पाहता, काँग्रेसमधील बदल आणि नाविन्याचा स्वीकार करण्याची (उशीरा का होईना!) लवचीकता स्पष्टपणे दिसून येत आहे.

सोनियाजी व्याधीग्रस्त झाल्यामुळे राहूल गांधी यांच्याकडेच सध्या काँग्रेस पक्षाची सूत्रे असल्याचे दिसून येत आहे. अर्थात आगामी 2019च्या लोकसभा निवडणुकीत तेच पक्षाचे नेतृत्व करतील हेदेखील स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर पक्षाला नवसंजीवनी देण्याचे कठीण काम त्यांच्यासमोर आहे. युपीएच्या दोन्ही व विशेषत: दुसर्‍या कालखंडात राहूल गांधी यांच्या तरूण सहकार्‍यांकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या होत्या. मात्र केंद्रीय मंत्रीमंडळातील तरूण मंत्र्यांकडून फारशी चमकदार कामगिरी पार पडली नाही. आणि अर्थातच यानंतर मोदींच्या झंझावातात काँग्रेसचे हे तरूण चेहरे अक्षरश: पडद्याआड गेले. वास्तविक पाहता विरोधात असतांनाच नेत्यांच्या कामगिरीचा खरा कस लागत असतो. मात्र सत्ता जाऊन तीन वर्षे उलटली तरी राहूल यांचे तरूण सहकारी भाजपवर हल्लाबोल करण्यात वा काँग्रेसचा विचार हिरीरीने पुढे मांडण्यात यशस्वी झाले नाहीत ही उघड बाब आहे. यामुळे लोकसभा व राज्यसभेत काँग्रेसला ज्येष्ठ नेत्यांवरच अवलंबून रहावे लागत असून सभागृहाबाहेरही हे तरूण तुर्क फारसे सक्रीय नसल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमिवर प्रोफेशनल काँग्रेसची सूत्रे शशी थरूर आणि मिलींद देवरा यांच्याकडे सोपविण्यात आल्याची बाब लक्षणीय आहे.

शशी थरूर यांना काँग्रेसने पुरेपूर वाव न दिल्याचे अनेक राजकीय निरिक्षकांचे मत आहे. यात सत्यांशदेखील आहे. सुमारे पाव शतकापर्यंत काँग्रेसची वैचारिक धुरा डॉ. मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी आणि पी. चिदंबरम यांच्यासारख्या अत्यंत विद्वान नेत्यांनी समर्थपणे सांभाळली होती. भविष्यात याच जातकुळीतले शशी थरूर यांच्याकडे काँग्रेसमध्ये महत्वाची जबाबदारी येणार असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात कधीपासूनच सुरू होती. प्रोफेशनल काँग्रेसच्या माध्यमातून या संदर्भातील पहिले पाऊल टाकण्यात आल्याचे आता दिसून येत आहे. तर दुसरीकडे मिलींद देवरा हे आधीपासूनच राहूल गांधी यांच्या मर्जीतले असल्याने त्यांच्या नावाचे कुणाला फारसे आश्‍चर्य वाटले नाही. राजकीयदृष्ट्या विचार करता काँग्रेसची दिशाहीन अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. देशात अजूनही काँग्रेसची विचारधारा संपलेली नाही. किंबहुना भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा दिला असला तरी ही बाब वाटते तितकी सोपी नसल्याचे उघड आहे. यामुळे समाजाच्या विविध स्तरांमध्ये काँग्रेसी विचार रूजविण्यासाठी वा भाजपविरोधी विचाराला काँग्रेस समर्थनात परिवर्तीत करण्यासाठी सुरू असलेला अभिनव प्रयत्न म्हणून आपण प्रोफेशनल काँग्रेसकडे पाहू शकतो.

अलीकडच्या काळात भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच्या प्रचारतंत्रासह अनेक बाबींमध्ये काँग्रेसला पीछाडीवर टाकले आहे. काँग्रेसने भाजपच्या अनेक संकल्पनांची कॉपी केली. अगदी 2014च्या लोकसभेतील भाजपच्या विजयाचा शिल्पकार म्हणून ख्यात झालेल्या प्रशांत किशोरची उत्तरप्रदेशात सेवा घेण्यात आली. त्याच्या सांगण्यावरून मोदींच्या ‘चाय पे चर्चा’ला ‘खाट पे चर्चे’ने उत्तर देण्याचा प्रयत्न झाला. नव्या पिढीला जोडण्यासाठी तंत्रस्नेहीपणाचा मार्ग पत्करण्याचा प्रयत्न झाला. तथापि, कोणतीही मात्रा लागू पडली नाही. यामुळे प्रोफेशनल काँग्रेसचा मार्गदेखील खडतर असेल हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची गरज नाहीच. तथापि, अतिशय नियोजनबध्द आणि अत्याधुनीक पध्दतीने देशभरातील प्रोफेशनल्सला जोडण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न अभिनव आणि खरं तर काँग्रेसी परंपरेपासून थोडा हटके असाच आहे. नोटाबंदीमुळे व्यावसायिकांचे कंबरडे मुडले आहे. यातच आता पुर्णपणे तयारी न करता जीएसटी लागू केल्याचे ‘साईड इफेक्ट’ आपल्यासमोर आहेच. या दोन्ही निर्णयांचा देशभरातील विविध व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. नोटाबंदीनंतर भाजपने काही राज्यांमध्ये यश संपादन केले असले तरी जीएसटीपश्‍चात ही कामगिरी करणे तसे सोपे नाही. कोण नोटाबंदीचा फटका हा प्रामुख्याने धनाढ्यांना बसला होता. मात्र जीएसटीमुळे व्यापारी आणि ग्राहक हे दोन्ही हैराण झाले आहेत. याचा विचार करता प्रोफेशनल काँग्रेसची संकल्पना ही या पक्षातील नव्या वाटेवर सुरू असणार्‍या मंथनातून समोर आल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे काँग्रेसला फार मोठा लाभ/हानी होण्याची शक्यता नसली तरी आता हा पक्ष भाजपच्या कमकुवत दुव्यांना हेरून अत्याधुनीक मार्गांनी रणनिती आखू लागल्याचे अधोरेखित झाले आहे.