मुंबई। प्रो-कबड्डी लीगमधील चार नव्या संघांच्या खरेदीस चांगला प्रतिसाद लाभला आहे. प्रो-कबड्डीतील नव्या संघांसाठी निविदा सादर करण्यासाठी 9 एप्रिलला दुपारी 12 पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज पाठविण्याची मुदत होती. या मुदतीत आलेल्या अर्जांची मशाल स्पोर्टस छाननी करणार आहे. त्यानंतर खुल्या निविदा प्रक्रियेद्वारे चार संघांची निवड होईल, असे जाहीर करण्यात आले आहे. हा प्रतिसाद आमच्या अपेक्षेपेक्षा थोडासा जास्तच आहे, असे प्रो-कबड्डी लीगमधील वरिष्ठ पदाधिकार्यांनी सांगितले.
कबड्डीला प्रो लीगमुळे अच्छे दिन
या चार नव्या संघांसाठी किती निविदा आल्या आहेत? कोणी सादर केल्या आहेत? हे सांगणे आता अनुचित ठरेल. यासाठी चांगला प्रतिसाद लाभला आहे. संघाच्या खरेदीसाठी अनेकांनी उत्सुकता दाखवली आहे. त्यातील काहींमुळे लीगची नक्कीच प्रतिष्ठा वाढेल, तसेच स्टारमूल्य वाढण्यासही मदत होईल, असेही या वरिष्ठ पदाधिकार्याने सांगितले. या लीगमधील आताचे संघप्रमुख नक्कीच प्रभावी आहेत. त्यांनी कबड्डीच्या प्रेमाखातर संघ विकत घेतले आहेत. आता येणारे संघप्रमुख कबड्डीच्या प्रेमाखातर असतीलच, त्याचबरोबर त्यांनी लीगची लोकप्रियताही चांगलीच अनुभवली आहे. त्यांनी याचा सर्वंकष विचार केलेला आहे, असेही सांगितले आहे. कबड्डी स्पर्धांना प्रो लीगमुळे अच्छे दिन येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नव्या संघाला मिळणार्या प्रतिसादामुळे लोकप्रियता अधिक व्यापक होत चालली असल्याचे दिसून येत आहे.