प्लास्टिकचा वापर रोखण्यावर भर!

0

उरण । जेएनपीटी नेहमीच शाश्‍वत प्रगतीवर भर देत असून, पोर्ट व आजूबाजूचा परिसर हरित क्षेत्र आणि प्रदूषण मुक्त बनवण्यासाठीच्या विविध उपाययोजनांचा अवलंब करत आहे. भारत सरकारच्या स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत जेएनपीटी संपूर्ण बंदर परिसरात आरोग्य, कचरा व्यवस्थापन व स्वछता कार्य योग्यरीत्या हाताळण्यास कटिबद्ध आहे. जेएनपीटीचे प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल यांनी पर्यावरण दिनानिमित्त सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाला शपथ दिली. जेएनपीटीच्या कामगारांनी त्याचबरोबरच संयुक्त राष्ट्र संघाच्या यावर्षीच्या बिट द प्लास्टिक या संकल्पनेवर आधारित पथनाट्य सादर केले. पर्यावरण संतुलनाचे ध्येय साध्य करण्याच्या उद्देशाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जेएनपीटीचे प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल यांनी मोबाइल पर्यावरण निरीक्षण वाहनाचे उद्घाटन केले. या वाहनाच्या माध्यमातून बंदरातील रिअल टाइम एअर क्वॉलिटीचे निरीक्षण केले जाणार असून, वाहन चालवण्याची व त्याच्या देखभालीची जबाबदारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास यांची असेल.

या वाहनामध्ये हवेतील प्रदूषण मोजण्यासाठी विशिष्ट यंत्र बसवण्यात आले असून, त्याद्वारे पोर्ट परिसरामध्ये हवेतील प्रदूषणास कारणीभूत ठरणार्‍या विशिष्ट घटकांचा / स्रोतांचा शोध घेऊन त्याचा सविस्तर अभ्यास केला जाईल. या वाहनाच्या माध्यमातून सोफिस्टिकेटेड इंस्ट्रुमेंटेशन सिस्टिम व लॉ कॉस्ट सेन्सर नेटवर्कचा एकत्रितरीत्या उपयोग करून रिअल टाइम एअर पोलुटंट कॉन्सेंट्रेशनच्या साहाय्याने हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक वर्तवण्यासाठी विशेष पद्धती विकसित केली जाईल. या विशेष पद्धतीमुळे हवेच्या गुणवतेची पातळी योग्य असल्याचे निश्‍चित करण्यासाठी पोर्ट प्रशासन सुधारात्मक उपाय करू शकणार आहेत.

पर्यावरणविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन
जेएनपीटी प्रशिक्षण केंद्र वेळोवेळी पर्यावरण संरक्षण उपायसंदर्भात माहिती देण्यासाठी व पर्यावरणविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करत असते. या महिन्यात आरोग्य, सुरक्षा व पर्यावरणावर आधारित 5 दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला असून, ज्यामध्ये प्रशिक्षणार्थींना कामाच्या ठिकाणी सुरक्षित साधनांचा वापर करून पर्यावरणावर त्याचा कमीत कमी परिणाम व्हावा यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याप्रसंगी बोलताना नीरज बन्सल म्हणाले, पृथ्वीचे संवर्धन करून संरक्षण करणे केवळ दिखाव्याची गोष्ट राहिलेली नाही, तर भविष्यात मानवजातीच्या अस्तित्वासाठी हे अत्यावश्यक झाले आहे. या कर्तव्याचे भान राखत जेएनपीटी सौर ऊर्जेचा वापर, सांडपाणी व्यवस्थापन, समुद्राच्या पाण्याच्या स्वच्छतेसाठी बहुउपयोगी बोट, घन कचरा व्यवस्थापन यांसारखे पर्यावरणास अनुकूल विविध उपाय पोर्ट व ड्राय पोर्ट येथे शाश्‍वत प्रगतीच्या उद्देशाने करत आहे तसेच त्यांनी सर्व कर्मचार्‍यांना त्यांच्या दैनंदिन वापरात प्लास्टिक न वापरता पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जेएनपीटी परिसरात वृक्षरोपण करून जागतिक पर्यावरण दिवस कार्यक्रमाचा समारोप झाला.