प्लास्टिकविरोधात सरकारचे धाडसत्र, हजारो किलो प्लास्टिकचा माल जप्त

0
मुंबईतील प्लास्टिक गोदामांवर धाडी
मुंबई : पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाने मुंबईतील मालाड, चिंचबंदर, मस्जिद बंदर या ठिकाणी प्लास्टिकच्या गोदामांवर धाडी टाकून हजारो किलो प्लास्टिकचा माल जप्त केला. भरारी पथकाने अजंठा ट्रान्सपोर्ट, मालाड, पूर्व या गोदामांवर कार्यवाही करुन बंदी असलेला एकूण १ हजार ३५९ किलो प्लास्टिक माल जप्त केला. तसेच या गोदामाला पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला. याबाबत पोलीस निरिक्षक दिंडोशी यांना पुढील कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले असून हा माल ट्रकद्वारे गुजरात मधून आणल्याचे आढळून आले.
तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे भरारी पथक व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ब विभागामार्फत मुंगीपा रोडवेज प्रा.लि., चिंचबंदर या गोदामावर धाड टाकली असता तेथील गोदामांमध्ये नॉन ओव्हन पॉलिप्रापीलीन व प्लास्टिक पी.पी.बॅग्स (50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या) साठवलेल्या आढळून आल्या. हा माल 1 हजार 3 कि.ग्रॅ. इतका असून गोदामाचे सहाय्यक व्यवस्थापक महावीर ओंकारमल शर्मा यांना पाच हजार रुपये दंड करण्यात आला. याच भरारी पथकाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ब विभागामार्फत मस्जिद बंदर मुंबई येथे एका दुकानावर कार्यवाही केली असता या ठिकाणी ४ हजार कि.ग्रॅ. वजनाचे प्लास्टिक पॅकेजींग, बॅगने भरलेले आढळले. हा माल दमण, गुजरात येथून आणल्याचे दिसून आले. या मालावर इपीआर नंबर नसल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ब विभागामार्फत तो जप्त करण्यात आला.
खुद्द पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या धाडी
श्री सिध्दीविनायक मंदिर परिसरात प्लास्टिकच्या बॅगेतून भाविकांना प्रसाद व फुले देणाऱ्या दुकानदारांवर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्वत:हून धाडी टाकून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. श्री सिध्दीविनायक मंदिरात दर्शनासाठी आज पर्यावरण मंत्री गेले असता, मंदिरातील परिसरात काही भाविकांच्या हातामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये प्रसाद, हार व फुले असल्याचे दिसून आले. या संदर्भात भाविकांशी विचारणा केल्यानंतर मंदिर परिसरातील संबंधित दुकानातून या पिशव्या देण्यात आल्याचे भाविकांनी सांगितले. त्या दुकानांची पाहणी केली असता दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या प्लास्टिकचा साठा आढळून आला. त्यानंतर मंत्री श्री. कदम यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून दुकानदारांवर कार्यवाही करुन दंड आकारण्याचे निर्देश दिले.