पुणे । त्यामुळे राज्यभर प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. प्लास्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या व प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, विक्री आणि साठवणुकीवर बंदी आणण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर त्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. परंतु, या बंदीबाबत कार्यवाही करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना अद्यापही जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सूचना आल्यानंतरच कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. जर जिल्हा प्रशासनाला शासनाने अद्याप मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत, तर महापालिका प्रशासन प्लास्टिक बंदीबाबत जी दंडात्मक कारवाई करत आहे, ती कशाच्या आधारे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिका प्रशासनाला प्लास्टिक बंदीबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.
राज्यभरात आता सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील प्लास्टिक वापराबाबत प्रशासकीय अधिकार्यांकडून सद्य:स्थितीचा आढावा घेतला होता. त्यानुसार बंदीला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम राबविणे, प्लास्टिकमुक्त ग्रामपंचायत अभियान राबविणे, महापालिकांना रोख रकमेची पारितोषिके देणे, कापडी पिशव्या वापरावर भर देणे अशा कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. प्लास्टिक बंदीची सुरुवात पुणे विभागात करण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असे तत्कालीन विभागीय आयुक्तांनी जाहीर केले होते. परंतु, राज्य शासनाकडून बंदीबाबत कोणत्याही प्रकारचे आदेश वा सूचना जिल्हा, विभागस्तरावर देण्यात आलेल्या नाहीत.
कागदी पिशव्यांची चलती
प्लास्टिक बंदीचे आदेश सरकारकडून देण्यात आल्यानंतर बाजारातील भाजी तसेच फळ विक्रे ते, किराणामाल विक्रेत्यांसह अनेक व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानातून प्लास्टिक पिशव्या हद्दपार केल्या आहेत. कारवाईच्या धसक्यामुळे कागदी पिशव्यांचा वापर सुरूकरण्यात आला असला तरी कागदी पिशव्या जादा वजनाचा माल वाहून नेण्यात तकलादू ठरत असल्याची ओरड विक्रेते करत आहेत. प्लास्टिक बंदीचे आदेश आल्यानंतर व्यापारी तसेच विक्रेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. वजनाने हलक्या असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा (पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या) वापर फळे तसेच भाजीपाला विक्रेत्यांकडून केला जातो. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आल्यामुळे शहरातील मंडई, नेहरू चौक भागातील फळे तसेच भाजीपाला विक्रेत्यांनी प्लास्टिक पिशव्या हद्दपार केल्या आहेत.
नंतरच कारवाई सुरू होईल
राज्यातील पुणे विभागात याबाबतची अंमलबजावणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे. तसेच प्लास्टिक बंदीबाबत राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी स्तरावर मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार योग्य कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी म्हटले आहे.