प्लास्टिक बंदीविरोधात आता व्यापार्‍यांचा संप

0

पुणे । राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाविरोधात आता व्यापारी संघटना एकवटल्या आहेत. द फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने या बंदीविरोधात संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने प्लास्टिक बंदी लागू करताना सर्वांगिण विचार केलेला नसल्याचा दावा व्यापार्‍यांनी केला आहे. राज्यातील 13 लाख छोट्या-मोठ्या दुकानदारांवर या बंदीचा परिणाम झाला आहे. या बंदीबाबत राज्य सरकारने योग्य ते स्पष्टीकरण करणे गरजे असल्याचेही व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

प्लास्टिक बंदीचे धोरण अयोग्य, अस्पष्ट
असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यासंदर्भात म्हणाले की, आम्ही बुधवार 20 जून रोजी संघटनेची बैठक बोलावली असून राज्यभरातील प्रमुख व्यापारी संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्लास्टिकवर लादण्यात आलेल्या अव्यवहार्य बंदीवर चर्चा करण्यात येणार आहे. कारण प्लास्टिक बंदीचे धोरण अयोग्य, अस्पष्ट आहे. या बंदीबाबत योग्य पर्याय व स्पष्टीकरण देण्यास शासनाने नकार दिला आहे. शासनाच्या प्लास्टिक बंदीला योग्य पर्याय समोर नसल्याने नागरिक, व्यापारी आणि उद्योगांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहा म्हणाले, उत्पादकांना त्यांची उत्पादने प्लास्टिक कव्हरमध्ये देण्यास परवानगी असताना किरकोळ व्यापार्‍यांना मात्र यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

किंमती व द्रवरूप माल देण्याचा प्रश्‍न
वरेश शाह म्हणाले, कापड उद्योजक प्लास्टिक बंदीपुर्वी पाऊस, धुळीपासून संरक्षण होण्यासाठी कापडाची उत्पादने प्लास्टिकमध्ये गुंडाळून पाठवत असत. कापड व्यापार्‍यांप्रमाणेच किराणा दुकानदारही त्रस्त आहेत. तेल, दुध, साखर, चहा पावडर आदी पदार्थ ग्राहकाला कसे द्यायचे, असा प्रश्‍न आहे. कागदी पिशव्यांमध्ये हे पदार्थ देऊ शकत नाही. तसेच कापडी पिशव्या परवडणार्‍या नाही. प्रत्येक व्यापारी अशाप्रकारच्या अडचणींना सध्या तोंड देत आहे. त्यामुळे बुधवारी 20 जूनच्या राज्याव्यापी बैठकीत संपाचा अंतिम निर्णय घेण्यात येईल.