पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या चार महिन्यातील कारवाई; थर्माकोल बंदीच्या अनुषंगाने अंमलबजावणी होणार अधिक तीव्र
कारवाई तीव्र करण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे निर्देश
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या चार महिन्यात प्लास्टिक वापरणार्यांकडून चार लाख 95 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच उद्यापासून प्लास्टिक बंदीवरील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. यापुढे प्लास्टिक व थर्माकोल बंदीच्या अनुषंगाने अंमलबजावणी अधिक तीव्र करण्याचे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे नुकतेच दिले आहेत. पर्यावरणाचा र्हास करणार्या प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, स्ट्रॉ, थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या, उत्पादने साठवण्यासाठी असलेली प्लास्टिकची आवरणे, द्रवपदार्थ साठवण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, अन्न पदार्थ साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिक व थर्माकोल डेकोरेशन यावर बंदी घातली आहे. 23 मार्च रोजी राज्य शासनाने प्लास्टिक बंदीची आधिसूचना जारी केली होती. त्यानंतर या वस्तूंचा साठा पूर्णपणे संपण्यासाठी 22 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती मुदत संपल्यानंतर महापालिकेने प्लास्टिक वापरणार्यांवर धडक कारवाई केली होती. मध्यंतरी ही कारवाई थंड झाली होती.
रोज किमान 10 दुकानांची तपासणी
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सींग’द्वारे संवाद साधून प्लास्टिक बंदीची जिल्हास्तरावर अंमलबजावणीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. प्लास्टिक व थर्माकॉल वापर बंदीची महापालिका कार्यक्षेत्रात कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार पालिका उद्यापासून कारवाई तीव्र करणार आहे. कार्यवाही करणेकामी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय चार याप्रमाणे 32 पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. यामध्ये प्लास्टिक व थर्माकोल यांचे वापरास संपूर्णत: बंदी करण्यात येणार आहे. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी प्लास्टिक व थर्माकोल बंदीबाबत जनजागृती करुन नॉन ओव्हन पिशव्यांवर संपूर्ण बंदी असल्याने त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रत्येक आरोग्य निरीक्षकास भाजी मंडईत पंधरा दिवसातून एकदा, व्यापारी क्षेत्रात आठवडयातून एकदा, मटन/मच्छी विक्रेत्यांकडे आठवडयातून एकदा व रोजच्या रोज किमान 10 दुकानांची तपासणी करुन त्याबाबतचे रेकॉर्ड ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
विद्यार्थ्यांमार्फत होणार जनजागृती
शालेय विद्यार्थ्यांमार्फत प्लास्टिक व थर्माकोल बंदीबाबत जनजागृती करण्यात येणार असून फेरीवाले, कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत, स्वच्छ, व्यापारी, प्लास्टीक असोसिएशन आदी संघटनांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. प्लास्टिक व थर्माकोल यांचे पुर्नवापराच्या अनुषंगाने रस्त्याचे डांबरीकरणामध्ये प्लास्टिकचा वापर करण्याचे नियोजन करणेबाबत स्थापत्य विभागास कळविण्यात आले आहे. प्लास्टिक व थर्माकोल बंदीच्या अनुषंगाने कचरा वेचकांकरिता प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.