प्लॅस्टिकमुक्ती केवळ कागदावरच

0

बारामती । विकासाच्या व्यवस्थापनात बारामती नगरपालिका देशपातळीवर नावाजलेली आहे. तसेच अन्य शहरांसाठीही ही नगरपालिका रोल मॉडेल ठरली आहे. मात्र, प्लॅस्टिक कचर्‍याचा प्रश्न सोडविण्यात ती अपयशी ठरली आहे. सर्वसाधारण सभेत ठराव करूनही पालिका प्रशासन यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे 7 वर्षानंतरही प्लॅस्टिकमुक्त बारामती कागदावरच असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

’प्रभागातील कचरा प्रभागात जिरवा’, कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे विकेंद्रीकरण आणि कचर्‍याचे वर्गीकरण होत असल्याचा प्रशासनाचा दावा यानिमित्ताने फोल ठरत असल्याचे चित्र सध्या दृष्टीस पडत आहे. प्लॅस्टिक कचर्‍याचा प्रश्न आज गंभीर बनला आहे.

कचरा निर्मूलनात अडचणी
शहरात कचर्‍याची समस्या गंभीर झाली आहे. त्याला प्लॅस्टिक हे मुख्य कारण आहे. प्लॅस्टिकमुळे कचरा निर्मूलनाबरोबरच कचरा जमिनीमध्ये जिरविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे संपूर्ण प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर 100 टक्के बंदी घालण्याचा निर्णय बारामती पालिकेने 16 एप्रिल 2010 मध्ये घेतला होता. मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी नेमलेले अधिकारी निष्क्रिय असल्यामुळे त्यांनी फक्त कागदावरच कारवाई करण्यात धन्यता मानली. तांत्रिक कारणांमुळे सात वर्षांनंतरही नियमावली न झाल्याने शहर प्लॅस्टिकमुक्त होण्याची शक्यता मावळली आहे.

100 टक्के प्लॅस्टिक बंदीचा निर्णय
राज्य शासनाने 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. राज्य सरकारने संपूर्ण प्लॅस्टिक बंदीबाबत रंगनाथन कमिटी नेमली होती. त्या कमिटीने संपूर्ण प्लॅस्टिक बंदी करता येणार नसल्याची शिफारस केली होती. तरीही बारामती पालिकेच्या सर्वसाधारण सभेने 7 वर्षापूर्वी 100 टक्के प्लॅस्टिक बंदीचा धाडसी निर्णय घेतला.

नियमावली रखडली
प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नियमावली तयार करून ती राज्य सरकारकडे पाठविण्याचे ठरविले होते. मात्र, राज्य सरकार या नियमावलीला कशाच्या आधारावर मान्यता देणार, हा प्रश्न निर्माण झाल्याने पालिका प्रशासनाने नियमावलीच तयार केली नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. त्यामुळे बारामती प्लॅस्टिकमुक्त होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

…तर कारवाई
प्लास्टिक कचर्‍याची समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप घेत आहे. शहरातल्या वाढत्या प्लास्टीकच्या कचर्‍याच्या निर्मूलनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. शहरात प्लास्टिकचे उत्पादन, विक्री व वापर करणार्‍या व्यापार्‍यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व हॉकर्स, भाजी-पाला, फळे, फुले विक्रते यांच्यावरही दंडात्मक कारवाई करणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य प्रशासनाने सांगितले.