प्लॅस्टिक उद्योजक, कामगार अडचणीत

0

पिंपरी-चिंचवड : प्लॅस्टिक बंदीमुळे राज्यातील प्लॅस्टिक उद्योजक आणि कामगार अडचणीत आले आहेत. त्यामुळे बंदी मागे घ्यावी; अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशारा पिंपरी-चिंचवड एमएसएमई इंडस्ट्रिअल असोसिएशन फोरमने दिला आहे. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना पाठविल्याचे फोरमचे अध्यक्ष प्रेमचंद मित्तल यांनी सांगितले.

निवेदनात फोरमने म्हटले आहे, की राज्य सरकारने उत्पादन कंपन्या, वितरकांना विश्‍वासात न घेता व तज्ज्ञांशी न बोलता प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. पर्याय म्हणून कचरा व्यवस्थापनाची गरज असून, सरकारने ही यंत्रणा बळकट करावी. प्रगत देशांमध्ये प्लॅस्टिक बंदी करण्यापूर्वी पर्याय उपलब्ध करून दिला जातो. प्लॅस्टिक उद्योजक व कामगारांच्या पुनर्वसनाची कोणती योजना तयार केली आहे, हे सरकारने सांगावे. एकीकडे मेक इन इंडिया व मेक इन महाराष्ट्र असे म्हणत उद्योगांना प्रोत्साहन दिले जात असताना प्लॅस्टिक बंदीचा निर्णय चुकीचा आहे. या संदर्भात सरकारने फोरमशी चर्चा करावी.