प्लॅस्टिक कचर्‍याचा पुनर्वापर करून इंधननिर्मितीचा प्रस्ताव

0

महापालिकेला विल्हेवाट लावण्यासोबतच उत्पन्ननिर्मितीचा लाभ

पुणे : शहरातील प्लॅस्टिक कचर्‍याचा पुनर्वापर करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे प्लॅस्टिकपासून इंधननिर्मिती करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात प्लॅस्टिक कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासोबतच त्यापासून उत्पन्ननिर्मितीचादेखील लाभ महापालिकेला मिळणार आहे.

जुलै महिन्यात राज्यात लागू झालेल्या प्लॅस्टिकबंदीनंतर राज्यप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नेतृत्वाखाली महापालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान शहरातील अनेक विक्रेते आणि निर्माते यांच्याकडून प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. तसेच घरगुती आणि व्यावसायिक कचर्‍याच्या माध्यमातूनही महापालिकेकडे प्लॅस्टिक कचरा जमा होत आहे. या कचर्‍याची विल्हेवाट स्थानिक स्वराज्य संस्थांनीच करायची अशा सूचना मंडळातर्फे करण्यात आली होती. मात्र, प्लॅस्टिक कचर्‍याच्या पुनर्वापर प्रक्रियेबाबत महापालिकेकडे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने प्लॅस्टिक कचर्‍याचे करायचे काय? असा प्रश्‍न
महापालिकेसमोर होता.

याबाबत पालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख, सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, सद्यस्थितीत महापालिकेकडे 400 मेट्रिक टन प्लॅस्टिक कचरा संकलित आहे. प्लॅस्टिक पुनर्वापर संदर्भात कोणतीही यंत्रणा सध्या महापालिकेकडे उपलब्ध नाही. तुर्तास या प्लॅस्टिक कचर्‍याचे संकलन करून, घोले रस्ता येथील प्रकल्पात त्याचे ‘श्रेडिंग’ म्हणजेच बारीक चुरा केला जातो. या कचर्‍यापासून इंधननिर्मितीसाठीचा प्रस्ताव आम्ही तयार केला असून, लवकरच तो स्थायी समितीसमोर मांडला जाईल. त्यानंतर आवश्यक त्या कंपन्यांना तो इंधननिर्मितीसाठी देण्यात येईल.

कचर्‍याबाबत जनजागृती

प्लॅस्टिकपासून इंधननिर्मिती हा अतिशय उपयुक्त उपक्रम आहे. यातून महापालिकेला उत्पन्नदेखील मिळू शकते. मात्र, या उत्पन्नाचा वापर महापालिकेने प्लॅस्टिक कचर्‍याबाबत जनजागृती करण्यासाठीच करावा. जेणेकरून नागरिकांमध्ये प्लॅस्टिकचा वापर न करण्याबाबत जागरूकता निर्माण होईल, असे राज्यप्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांनी सांगितले.