प्लॅस्टीक विक्रेते रडारवर ; भुसावळ, रावेरसह फैजपूरात कारवाई

0

शासनाच्या नेमक्या अध्यादेशाबाबत विक्रेत्यांसह दुकानदारांमध्ये संभ्रम ; भ्रष्टाचार वाढण्याची भीती

भुसावळ- प्लॅस्टीक कॅरीबॅगवर शासनाने बंदी आणल्यानंतर निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी भुसावळ विभागातील पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. सोमवारी भुसावळसह रावेर व फैजपूरावर विक्रेत्यांवर कारवाईचा आसुड ओढत दंड वसुल केला मात्र या कारवाईमुळे विक्रेत्यांसह दुकानदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सरसकट सर्वच प्लॅस्टीक कॅरीबॅगवर बंदी आणण्यात आली की 50 मायक्रॉन आतील कॅरीबॅगला बंदी ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे शिवाय प्रशासनाने या संदर्भात ठोस भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा निर्णय स्तुत्य असलातरी त्यातून भ्रष्टाचाराला चालना मिळण्याचीदेखील शक्यता व्यक्त होत आहे. प्लॅस्टीक बंदीमुळे अनेकांच्या व्यवसायांवर संकट कोसळले असून त्यातील पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्लॅस्टीकबंदी ; भुसावळातही कारवाई, दुकानदाराला पाच हजारांचा दंड

भुसावळ- राज्यात प्लॉस्टीक बंदीची घोषणा सरकारने 23 जूनपासून केल्यानंतर सर्वत्र त्याची अंमलबजावणी केली जात असताना भुसावळ पालिकेनेही सोमवारी शहरातील जामनेर रोडवरील कुकरेजा सुपर मार्टमधून प्लॅस्टीक कॅरीबॅगसह अन्य साहित्य जप्त केले. दुकानाचे मालक रोशन कुकरेजा यांच्याकडून पाच हजारांचा दंड वसुल करण्यात आला. पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी आरोग्याधिकारी निवृत्ती पाटील, आरोग्य निरीक्षक प्रदीप पवार, आरोग्य निरीक्षक व्ही.सी.राठोड, पर्यवेक्षक सुरज युवराज नारखेडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

दुकानांची तपासणी, धडक कारवाई होणार
सोमवारी पालिकेच्या पथकाने शहरातील दुकानदांसह मॉलची तपासणी केली तसेच मंगळवारपासून धडक कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जामनेर रोडवरील साईजीवन सुपर शॉपचीही तपासणी झाली मात्र त्यात काही आढळले नसल्याचे सांगण्यात आले. पालिकेने कारवाईसाठी चार स्वतंत्र पथकांची स्थापना केली असून धडक कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर म्हणाले. नागरीकांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

रावेरमध्ये 87 किलो प्लॅस्टीक जप्त ; दुकानदारास पाच हजारांचा दंड
रावेर- प्लॅस्टीक कॅरीबॅग बंदीच्या अंमलबजावणीसाठी रावेर पालिकेने कंबर कसली असून सोमवारी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या नेतृत्वाखाली छोरीया मार्केटमधील बालाजी प्लास्टिक दुकानातुन 15 हजार रुपये किंमतीचे 87 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तर दुकान चालकाला पाच हजाराचा दंड सुनावण्यात आला. स्टेशन रोड, छोरीया मार्केट परिसरातील दुकानांमध्ये तपासणी करण्यात आली. आरोग्य निरीक्षक धोंडू वाणी, वसुली लिपिक दीपक सुरवाडे, कॅशियर गणेश महाजन, शांताराम पाटील, गणेश रणसिंगे, पंकज बागरे, नगीन जावे, अशोक माळी, नीलेश महाजन, मंदार पाटील , कॉन्स्टेबल संदीप धनगर आदीनीं ही कारवाई केली.

फैजपूरात एकावर कारवाई :चौघांना नोटीसा
फैजपूर- शासनाच्या प्लॅस्टिक बंदी निर्णयानंतरही शहरातील दुकानामध्ये सर्रास कॅरीबॅग वापरणार्‍या पाच दुकानंदारांविरुद्ध फैजपुरचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी धडक कारवाई करत त्यांना दंड आकारला. ज्या दुकानदारांनी दंड भरण्यास नकार दिला त्यांना नोटिसा देऊन दंडाची रक्कम संबधीतांच्या मालमत्ता करामध्ये लावण्याचे आदेश मुख्याधिकारी चव्हाण यांनी दिली. 23 मार्चपासून शासनाने प्लास्टिक बंदी केली आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी चव्हाण व पालिकेच्या पथकाने शहरातील विविध दुकानामध्ये अचानक भेटी देऊन दुकांनाची तपासणी केली. त्यात शहरातील राजकमल जनरल स्टोअर्स, नानंदलाल अ‍ॅण्ड कंपनी, कृष्णा मेन्स वेअर, विजय जनरल स्टोअर्स व शिव कल्याणी किराणा मर्चंट स्टोअर्स या दुकानामध्ये प्लस्टिक बंदी असतांना कॅरीबॅग, ग्लास, थर्माकोल, वाट्या आदी असलेल्या प्लस्टिकच्या वाट्या आढळून आल्या. त्यामुळे प्रत्येकी पाच हजार रुपये भरण्याच्या सूचना केल्या त्यात एकमेव विजय जनरल स्टोअर्स यांनी दंडाची रक्कम भरली अन्य चौघांनी दंडाची रक्कम न भरल्यामुळे यांना पालिकेतर्फे नोटिसा देऊन 24 तासाच्या आत दंडाची रक्कम भरण्याचे आदेश देत न भरल्यास कायदेशीर कार्यवाई करण्यास येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

दुकानदारांनी साठा हलवला
पालिकेच्या कारवाईमुळे शहरातील व्यवसायीकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी कारवाई करत असतांना अनेक व्यावसायीकांनी आपल्या दुकानात असलेला कॅरीबॅग व अन्य प्लॅस्टीक साहित्याचा साठा इतरत्र हलवण्यात आला आहे. दरम्यान, मुख्याधिकारी चव्हाण यांनी सायंकाळी व्यावसायीकांची बैठक घेत शासनाच्या कॅरीबॅग बंदी निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी नगरसेवक मिलिंद वाघुळदे, गटनेता शेख कुर्बान व गावातील व्यावसायिक उपस्थित होते. या पथकात लेखापाल संजय बानाईते, वसुली प्रमुख विशाल काळे, वसुली विभागातील रमेश सराफ, विक्की बागुल, टि. एन चौधरी, दिलीप वाघमारे, प्रसन्न डोलारे, दिपक सराफ,भूषण वारुळकर, प्रवीण सपकाळे, हेमंत फेगडे, यांचा समावेश होता.

भरारी पथक केव्हाही येणार गावात
बैठकीत मुख्याधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, शहरात शासनाचे भरारी पथक केव्हाही दाखल होऊ शकते त्यामुळे नागरीक आणि व्यावसायीक यांनी प्लास्टिक कॅरीबॅग व अन्य वस्तूंचा वापर करून नये. तीन दिवस शहरातील प्रत्येक भागात पालिकेचे टॅक्टर फिरणार आहे घरातील कॅरीबॅग व अन्य प्लस्टिकच्या वस्तू नागरिकांनी त्यात टाकून द्याव्या अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे आवाहन त्यांनी केले.